भारतात ७३ टक्के अल्पवयीन मुले करतात फेसबुकचा वापर

fb
१३ वर्षांखालील मुलाना फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटचे अकौंट दिले जाऊ नये यासाठी कडक नियम असतानाही भारतात ८ ते १३ या वयोगटातील ७३ टक्के मुले फेसबुकचा सर्रास वापर करत असल्याचे असोचेमच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. यात मेट्रो आणि अन्य मोठ्या शहरातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे .विशेष म्हणजे यातील ७५ टक्के पालकांना मुलांचे फेसबुक अकौंट असल्याची माहिती आहे तर ८२ टक्के पालकांनीच मुलांना ही अकौंट उघडून दिली असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

इतक्या लहान वयापासून सोशल साईट पाहणे हे मुलांसाठी अतिशय धोकादायक ठरू शकते असे असोचेम हेल्थ कमिटीचे अध्यक्ष बी. के. राव यांचे म्हणणे आहे. भारतात पसरत चाललेला हा ट्रेंड अतिशय धोकादायक असल्याचे सांगून ते म्हणतात की यातून मुलांचे सायबर बुलींग तसेच ऑनलाईन सेक्झुअल अॅब्युजला मुले बळी पडण्याचा धोका मोठा आहे. या वयातील मुलांना सोशल साईट नक्की कशा वापराव्या याचे ज्ञान नसते आणि अनुभवही नसतो. त्यामुळे माहितीत युझर चे वय उघड झाले तर लैगिंक शोषण करणारे त्यांना शिकार बनवू शकतात.

या सर्वेक्षणानुसार १३ वर्षांखालील २५ टक्के, ११ वर्षाखालील २२ टक्के, १० वर्षांखालील १५ टक्के तर ८ ते ९ या वयंोगटातील ५ टक्के मुले फेसबुकचा वापर करत आहेत. पालकच मुलांना त्याची सुरवात करून देतात आणि मुलांना त्याचे व्यसन लागले की त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न करतात मात्र तो पर्यंत वेळ हातातून गेलेली असते. हे सर्वेक्षण दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, कोलकाता, अहमदाबाद, हैदा्राबाद, डेहराडून आणि लखनौ या शहरात करण्यात आले आणि त्यात ४२०० पालक सहभागी झाले होते.

Leave a Comment