नेत्यांनाही असतो दागदागिन्यांचा शौक

kher
राजकारणी नेते म्हटले की गाड्या, बंगले हे असणारच. पण या नेत्यांना दागदागिन्यांचाही शौक असतो बरे का! निवडणूकीच्या रिंगणात उतरताना या नेत्यांनी आपल्या मालमत्तेसंबंधात दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्व पक्षांचे नेते यात सामील आहेत. आपल्या महाराष्ट्रातील नेतेही यात मागे नाहीत.

सर्वाधिक सोने चांदी व हिरे जिंदाल उद्योगसमुहाचे प्रमुख व काँग्रेसचे उमेदवार नवीन जिंदाल यांच्याकडे असल्याचे या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. अन्य करोडोंच्या मालमत्तेशिवाय त्यांच्याकडे १७ किलो सोने, ५४ किलो चांदी व बहुमोल हिरे असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकासिंसिह बादल यांच्या स्नुषा हरसिमरत कौर यांच्याकडे ५ कोटी ४७ लाख रूपयांचे दागिने आहेत. तर अमरसिह यांच्याकडे १४ किलो सोने आणि ५६ किलो चांदी आहे. हरियाणातील काँग्रेसच्या उमेदवार श्रुती चौधरी या ११ किलो सोने, ९१ किलो चांदी व अनेक हिर्‍यांची मालकीण आहेत. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्तीबरोबरच ३ कोटी ८३ लाखांचे जडजवाहिर आहे.

पुण्यातून खासदार पदाची निवडणक लढविलेल्या विश्वजित कदम यांच्याकडे ५ कोटी ३४ लाखांचे दागिने असून त्यात ५ किलो सोने ११ किलो चांदी आहे. सागर मेघे यांच्याकडे ८.३ किलो सोने व हिरे, हिर्‍यांच्या चिपा व ११ किलो चांदी आहे. भाजपच्या किरण खेर यांच्याकडे १२ किलो सोने व ८ किलो चांदी आहे तर काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात असलेले इन्फोसिसचे माजी भागीदार नंदन नीलेकणी यांच्याकडेही सोने हिरे यांचे दागिने आहेत. जेडीयूचे उमेदवार अनिल शर्मा यांच्याकडे १० किलो सोने चांदीचे दागिने आहेत.

Leave a Comment