मारूतीचा नफा घटला

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूतीची गाडी वित्तिय वर्षाच्या चौथ्या तिमाहीत नफ्याच्या रूळावरून चांगलीच घसरली आहे. याकाळात कंपनीच्या नफ्यात ३५ टक्के घट झाली आहे. कंपनीला या काळात ८०० कोटींचा नफा झाला आहे. या बातमीने दलाल स्ट्रीटवरही खळबळ माजली असल्याचे समजते.

मारूतीचे अध्यक्ष आर.सी.भार्गव या संदर्भात बोलताना म्हणाले की गतवर्षी याच काळात कंपनीची एकूण उलाढाल १३,३०४ कोटी होती आणि कंपनीला १२४० कोटी रूपयांचा नफा मिळाला होता.यंदा ही उलाढाल १२,०१०१ कोटींवर आली असून नफा ८०० कोटींवर घसरला आहे. गाडी विक्री कमी झाल्यामुळे तसेच डिलरना द्याव्या लागत असलेल्या जादा कमिशनचा भार वाढल्यामुळे ही परिस्थिती दिसत असली तरी निवडणुकांनंतर त्यात सुधारणा होईल. कंपनीचा नफा कमी झाला असला तरी गुजराथ प्रकल्पात ३ हजार कोटींची जादा गुंतवणुक कंपनी करणार असून या वर्षात ३ नवी मॉडेल्सही लाँच करणार आहे.

Leave a Comment