स्वस्थ बसे तोचि फसे

स्वस्थ बसे तोचि फसे. ही बाल वयातली कवितेची ओळ सर्वांनाच आठवत असेल. पण आता या ओळीचा वेगळा अर्थ डॉक्टरांनी काढला आहे. स्वस्थ बसून काम करतो. म्हणजे बैठी कामे करतो तो अनेक विकारांना बळी पडतो. रक्तदाब, मधुमेह आणि शेवटी हृदयविकार ही तर बैठ्या कामांची देणगीच. पण आता डॉक्टरांनी बैठी कामे करणारे आणि सतत काम नसतानाही केवळ बसून राहणारे लोक केवळ या सामान्य विकारांनाच नव्हे तर कर्करोगालाही बळी पडण्याची शक्यता असते असे दाखवून दिले आहे. अमेरिकेतल्या स्तनांच्या कर्करोगाची ४९ हजार प्रकरणे आणि गर्भाशयाची ४३ हजार प्रकरणे तपासल्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. सतत बसून राहणार माणूस धूम्रपान करतो, जाड असतो आणि त्यातच अमेरिकेतल्या लोकांना डुकरांचे मांस खाण्याची ङ्गार आवड आहे. या मांसात चरबीचे प्रमाण खूप असते. या आहाराने आणि सतत एका जागेवर बसून असणे या गोष्टीच अशा प्रकारच्या दोन कर्करोगांना निमंत्रण देतात. यासाठी केवळ कामच बैठे असले पाहिजे असे नाही.

काम तर बैठे असतेच पण कामावरून घरी आल्यानंतर हे बैठे लोक पुन्हा टीव्ही पहात बसतात. किंवा पत्ते खेळत बसतात. इ मेल चेक करीत बसतात. मुलांचा अभ्यास घेत बसतात. सिनेमाला, कार्यक्रमाला किंवा व्याख्यानाला गेले असले तरी तिथेही बसलेलेच असतात. म्हणजे पोटा पाण्यासाठी करायचे काम बैठे आणि बाकी सारी कामेही बैठीच. तेव्हा त्यातून उद्भवणारा कर्करोग टाळायचा असेल तर ही सारी कामे करताना थोडे फिरा. उठून अंगाला आळोखे पिळोखे द्या. घराबाहेर जा. अंगणात, गॅलरीत, पोर्चमध्ये चकरा मारा. अंगाला थोडी तरी हालचाल होऊ द्या. इ. मेलवर घंटाभर बसलेले असाल तर मधूनच उठा, आपल्या हाताने पिण्याचे पाणी घेऊन ते प्या किंवा तहान नसेल तर उगाच बेसीनपर्यंत जा. तोंडावर पाण्याचा सपकारा मारा. तेवढीच हालचाल होईल आणि तोंडावर सपकारा बसल्याने फ्रेश वाटेल.

मुलाचा अभ्यास घेत असाल तर खाली किंवा खुर्चीवर बसलेले असाल तर बसूनच अभ्यास घेतला पाहिजे असे काही नाही. मधूनच उठून, ङ्गेर्‍या मारत मारतही अभ्यास घेता येतो. अशा हालचालींनी रक्ताभिसरण होते, शरीरातल्या चयापचय क्रिया होण्यासाठी आवश्यक असलेली एन्झाइम्स संतुलितपणे झिरपतात आणि स्नायूंचे शैथिल्य कमी होते. एवढ्या गोष्टी घडण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी पायी चालणे तर उत्तमच पण वर म्हटल्या प्रमाणे अधुन मधुन शरीराला हालचाली करायला लावणेही फायदेशीर ठरते. अशा प्रकारच्या हालचाली ङ्गार कराव्या लागत नाहीत पण दिवसभरात किमान ३० मिनिटे तरी अशी हालचाल करावी.ज्या हालचालीत आपण बसलेलो नसतो. फोन आला म्हणजे त्यावर एका जागी बसून बोलण्याऐवजी घरातच ङ्गेर्‍या मारत बोलावे तेवढीही हालचाल पुरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment