मुंबई-चेन्नईत कोण बाजी मारणार

अबूधाबी- यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत दोन सामने खेळूनही पराभव पत्कारावा लागल्याने मुंबई इंडियन्स संघाची पाटी कोरीच आहे. त्यांचा शुक्रवारी तिसरा सामना होत आहे. शुक्रवारच्या या सामन्यांत त्यांची गाठ चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. त्यामुळे या लढतीत तर मुंबईला चांगली सुरुवात करून विजय मिळवावा लागणार आहे.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नाही आता त्यांची गाठ पडणार आहे ती चेन्नई सुपर किंग्जशी. चेन्नईने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दोन्ही लढती जिंकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, तर मुंबईला दोन्ही लढती गमवाव्या लागल्याने ते गुणतालिकेत तळापासून दुस-या स्थानावर आहेत. त्यामुळे या सामन्यात मुंबईसाठी विजयाचे दार उघडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुंबईकडून मायकेल हसीला सलामीसाठी पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न आतापर्यंत फसला आहे. त्यामुळे रोहितने सलामीला येऊन जर हसीला मधल्या फळीत पाठवले तर संघाच्या पथ्यावर पडू शकते. किरॉन पोलार्ड आणि कोरे अॅहन्डरसन यांना अजूनही सूर गवसलेला नाही. गोलंदाजीमध्ये झहीर खान आणि लसिथ मलिंगा चांगल्या फॉर्मात आहेत. चेन्नईकडे रवींद्र जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू असून तो चांगल्या फॉर्मात आहे. पण फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्यांना सातत्य ठेवता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment