कॉंग्रेसचे आत्मघातकी निर्णय

कॉंग्रेसच्या नेत्यांना पराभव दिसायला लागला आहे परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी धडपड करून पराभव टाळावा किंवा फार दारूण पराभव होऊ नये यासाठी त्यांची धडपड जारी आहे. त्यांनी वरकरणी आपणच सत्तेवर येणार असे उसने अवसान आणून सांगायला सुरूवात केली आहे. परंतु मनातून मात्र ते खंतावले आहेत आणि आपला पराभव होणार याची खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे. अर्थात, निवडणुकीचे पुढचे टप्पे पार पडे पर्यंत अजून काही तरी युक्ती करून अंदाजापेक्षा अधिक जागा मिळवून दाखवाव्यात असा त्यांचा प्रयास जारी आहे. पण त्या दृष्टीने कॉंग्रेसची जी पावले पडायला लागली आहेत तिच्यामुळे कॉंग्रेसचीच अवस्था अधिक बिकट होत चालली आहे आणि होऊ पाहणारा पराभव अपेक्षेपेक्षा अधिक दयनीय असा होण्याची संभावना वाढत आहे. भाजपाला रोखण्यासाठी म्हणून या पक्षाचे नेते जी काही चाल खेळतात ती चाल त्यांच्या पथ्यावर पडण्याऐवजी भाजपाच्याच फायद्याची ठरते. असे घडत आलेले आहे. ही अवस्था एवढी गंभीर आहे की बुडत्याचा पाय खोलात म्हणण्याऐवजी बुडत्याचे शरीरच खोलात असे म्हणण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेस पक्षाला पराभवाची चाहूल लागली आहे आणि तो टळावा यासाठी या पक्षाचे नेते निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच नव्या नव्या युक्त्या करायला लागले आहेत.

आपण आता मोदींची चाल रोखू शकत नाही आणि आपला पराभव काही टळत नाही हे लक्षात आल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्टॉप मोदी मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेत आता कॉंग्रेसचे नेते तिसर्‍या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल काय याची चाचपणी करायला लागले आहेत. जर कॉंग्रेस आणि भाजपा यांना वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी सत्तेवर येऊ शकत असेल तर तिला कॉंग्रेसनी बाहेरून पाठिंबा द्यावा आणि रालो आघाडीच्या ऐवजी तिसर्‍या आघाडीचे सरकार सत्तेवर आणून भाजपाचा रथ रोखावा असा नकारार्थी प्रयत्न कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेला आहे. कॉंग्रेसचे डावपेच आखणारे अतीशहाणे लोक कोण आहेत हे माहीत नाही परंतु त्यांच्या डोक्यात परमेश्‍वराने अक्कल नावाची काही चिज निर्माण केली आहे की नाही असा प्रश्‍न पडतो कारण कॉंग्रेसचा हा प्रयत्न कॉंग्रेसच्याच मुळावर येणारा आहे. कारण कॉंग्रेसने तिसर्‍या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले तर लोकांपर्यंत एक चुकीचा संदेश जाणार आहे. याची जाणीव या कथित चाणक्यांना नाही. तिसर्‍या आघाडीला प्रोत्साहन देणे म्हणजे राजकीय अस्थिरतेला प्रोत्साहन देणे आहे. कॉंग्रेस जर तिसर्‍या आघाडीला प्रोत्साहन देत असेल तर आपण आपले मत स्थिर सरकारसाठी दिले पाहिजे असे लोकांना वाटणार आहे.

सध्या तरी स्थिर सरकार देण्याची क्षमता मोदी यांच्यातच आहे. अशी लोकांची भावना आहे. म्हणजे मोदींच्या द्वेषापोटी कॉंग्रेसने असले उलटे पालटे डावपेच आखले तर त्याच्यामुळे मोदींचेच बळ वाढणार आहे. तिसरी आघाडी कोणालाच नको आहे आणि मोदी लोकांना हवे आहेत. मोदींच्या बाबतीत जे लोक अजूनही मतदान निश्‍चित करण्याच्या सीमारेषेवर आहेत ते लोक कॉंगे्रसच्या अशा डावपेचांमुळे मोदींच्या बाजूला कलणार आहेत. म्हणजेच कॉंग्रेसचे नेते तिसर्‍या आघाडीला प्रोत्साहन देऊन मोदींची शक्ती वाढवत आहेत. असाच आणखीन एक डाव कॉंग्रेसने टाकला आहे. तो म्हणजे मुस्लिमांना आरक्षण. आता ज्या टप्प्याचे मतदान उरले आहे. त्या टप्प्यातल्या मुस्लिमांनी तरी आपल्याला मते द्यावीत म्हणून कॉंग्रेसने पुरवणी जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. या पुरवणी जाहिरनाम्यात मुस्लीम समाजातील मागास जातींना आरक्षण देण्याची घोषणा कॉंग्रेसने केली आहे. त्यामुळे मुस्लीम समाज आपल्या बाजूने उभा राहील असा कॉंग्रेसच्या नेत्यांचा भ्रम आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत या भ्रमाचा भोपळा फुटला होता. त्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुस्लिमांना आरक्षणाचे गाजर दाखवल होते.

सलमान खुर्शिद यांच्यासारखे नेते मुस्लिमांना आरक्षणाचे आश्‍वासने द्यायला लागले तेव्हा मुस्लीम तरूणांनी त्यांना खडसावले. आरक्षणाचा आदेश आता काढणार असाल तरच मते देऊ असे बजावले. कॉंग्रेसच्या नेत्यांना आदेश काढायचा नव्हता. कारण तो आदेश न्यायालयात टिकणारा नव्हता. शिवाय ऐन निवडणुकीत तसा आदेश काढणे महागात पडले असते. त्यामुळे आदेशही काढता आला नाही आणि उत्तर प्रदेश विधानसभेत २० जागांवर समाधान मानावे लागले. आता पुन्हा एकदा तशी थापेबाजी सुरू केली आहे. कदाचित या आरक्षणाच्या आश्‍वासनाचा मुस्लिमांवर परिणाम झालाच तर त्याची प्रतिक्रिया हिंदू समाजात उमटेल आणि हा समाज नाराज होऊन मोदींच्या मागे भक्कमपणे उभा राहील हे कॉंग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात येतच नाही. इतकी त्यांची डोकी बथ्थड झाली आहेत. शिवाय या आरक्षणाच्या आश्‍वासनात मुस्लीम धर्माच्या मागास जातींना ओबीसीमध्ये आरक्षण दिले जाईल असे कॉंग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. म्हणजे त्यामुळे तर ओबीसी समाज अधिक संतप्त होणार आहे. कारण त्यांच्या २७ टक्के कोट्यात मुस्लीम भागीदार होणार आहेत. हे सगळे चिडलेले ओबीसी संघटितपणे मोदींच्या मागे उभे राहू शकतात. म्हणजे मुस्लिमांना खुष करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते निवडणुकीच्या टप्प्यातच जी धडपड करत आहेत ती त्यांनाच अंंगलट येणार आहे आणि भाजपाचा फायदा होणार आहे.

Leave a Comment