राजस्थानवर चेन्नईचा ‘सुपर’ विजय

दुबई : आयपीएल स्परर्धेत रोमहर्षक ठरलेल्या. लढतीत राजस्थान रॉयलवर केवळ सात धावांनी विजय मिळवीत चेन्नईचा संघ सुपरविजेता ठरला. चेन्नईकडून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करताना अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने ३६ धावा करतानाच दुसरीकडे ३३ धावा देता चार गडी बाद केले. त्याच्या या गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयलचा डाव गडगडला.

आयपीएल स्पर्धेतील या रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार शेन वॉटसनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्जने ६ बाद १४० धावा केल्या. सलामीवीर ड्‌वेन स्मिथच्या २८ चेंडूत ५० धावा केल्या. तर शेवटी डाव सावरताना रवींद्र जडेजाने ३६ धावा केल्याने चेन्नईला काहीशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. ब्रेंडन मॅक्युलम, सुरेश रैना, फाफ ड्यू प्लेसी, कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे तगडे फलंदाज अपयशी ठरल्याने चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानकडून रजत भाटियाने दोन तर स्टुअर्ट बिन्नी, प्रवीण तांबे आणि जेम्स फॉकनर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

चेन्नईच्यां १४० या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अभिषेक नायर५, रंगात येत असलेला अजिंक्य रहाणे (१५) हे दोघे लवकर बाद झाल्याने डावाला गळती लागली. नायर धावबाद झाला तर रहाणेला अश्विनने झेलबाद केले. जडेजाने कर्णधार वॉटसन व गुणवान फलंदाज संजू सॅमसन यांना एकाच षटकात तंबूत धाडल्याने रॉयल्सची अवस्था बिकट झाली. स्टीव्हन स्मिथ (१९), भाटिया (२३) व तळाचा धवल कुलकर्णी (२८) यांनी फटकेबाजी करून रंगत आणली. मात्र, जडेजाच्या फिरकीने सामना चेन्नईच्या बाजूने खेचून आणला. त्याने ३३ धावांत रॉयल्सचे चार खंदे मोहरे टिपले.

Leave a Comment