गंभीर-कोहली आज आमनेसामने

शारजा – आयपीएलमध्ये गुरुवारी टीम इंडियातील दोन स्टार क्रिकेटपटू आमनेसामने उभे ठाकणार आहेत. यंदाच्या आयपीएल स्पसर्धेत विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ दोन विजय मिळवित सुसाट सुटला आहे. आज होत असलेल्या सामन्यात गौतम गंभीरच्या कोलकाता नाइट रायडर्सला जबरदस्त खेळ करीत असणा-या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामोरे जावे लागणार आहे. यावेळी कोहलीचा संघ सलग तिस-या विजयाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करेल.

आयपीएलच्या या स्पर्धेत विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सुरुवातीच्या दोन सामन्यात प्रतिस्पर्धी संघासमोर तगडे आव्हान निर्माण करीत विजय मिळविला असल्याने या स्पर्धेत सध्या त्यांचे पारडे जड वाटते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या‍ तुलनेत कामगिरीत थोडासा मागे असलेला गौतम गंभीरच्या कोलकाता नाइट रायडर्सला या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या दष्टीने ही लढत महत्वाची मानली जात आहे.

सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सुपरस्टार क्रिकेटपटू असून त्यांच्याकडून छान खेळ होत आहे. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत युवराज सिंग, विराट कोहली व अब्राहम डिव्हिलीयर्स यांनी दमदार फलंदाजी करीत संघाला सलग दोन विजय मिळवून दिले आहेत. उद्याच्या लढतीत गेलचे पुनरागमन होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना या दिग्गज फलंदाजांना रोखावे लागणार आहे. ही जबाबदारी मॉर्ने मॉर्केल, विनयकुमार, सुनील नरीन, जॅक कॅलिस, शाकीब उल हसन, युसूफ पठाण यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment