स्वप्न पाहून अनंत अंबानींनी केला पांढरा हत्ती दान

मुंबई – रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी सध्या कन्येमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या मुलीने म्हणजे इशा हिने अमेरिकन कंपनी मॅकेंझी मध्ये नोकरी सुरू केल्यामुळे ही चर्चा सुरू असतानाच त्यांचा मुलगा अनंत हाही आणखीनच वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे.

गोष्ट आहे २०१२ सालातली. त्यावेळी अनंत याला स्वप्नात सतत पांढरा हत्ती दिसत असे.  अनंत हा अंबानी कुटुंबात सर्वात धार्मिक प्रवृत्तीचा आहे. पांढर्‍या हत्तीच्या स्वप्नात येण्यामुळे तो थोडा अस्वस्थ बनला आणि स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी अनेक ज्योतिषी तज्ञांना भेटला. त्याचवेळी त्याला तिरूमला तिरूपती च्या मंदिरात पद्मावती आणि ज्योती नावाच्या दोन हत्तीणी असल्याचे समजले. अनंत ताबडतोब तिरूपतीला रवाना झाला. व्येंकटेशाचे दर्शन घेऊन मुंबईला परतल्यावर त्याने पुन्हा तिरूपती वारी केली. तेथील गोशाळा पाहिली आणि पांढरा हत्ती दान करण्याचा संकल्प केला.

अनंतच्या संकल्पपूर्तीसाठी अवघा रिलायन्स समुह कामाला लागला. भारतभर पांढर्‍या हत्तीचा तपास करूनही तो न मिळाल्याने अखेर तो आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार थायलंडमधून असा हत्ती आयात करण्यात आला व दान केला गेला असे समजते.

तिरूपती येथील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदिराला हत्ती दान करण्याची प्रथा जुनी आहे. आयुष्यात मिळालेले मोठे यश कायम राहण्यासाठी हत्तीदान केले जाते. जयललिता यांनीही प्रथम मुख्यमंत्री बनल्यावर तिरूपतीला हत्ती दान केला होता. देवेगौडा यांनीही पंतप्रधान बनल्यावर हत्तीदान केले होते. मात्र हत्ती दान म्हणून स्वीकारण्यापूर्वी त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून मगच स्वीकारला जातो असेही सांगितले जाते. मंदिराकडे असे दान स्वरूपात आलेले ६ हत्ती आहेत.

Leave a Comment