मुंबई – मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या ‘टार्गेट’वर पुन्हा परप्रांतीय आले आहेत, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा आता बसणार आहे ;पण मतांच्या समीकरणात अडकलेल्या राजकीय पक्षांना कोंडीत पकडण्याची चाल सुरु झाल्याचे राज ठाकरे यांच्या सभेतून पुन्हा दिसून आले. ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतीयांना मारहाण करण्याचा इशारा दिला आहे.
दक्षिण मध्य मुंबई मतदार संघात लालबाग येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्या उत्तर भारतीय हिसकावणार असतील. तर, पुन्हा मारीन असा इशाराच दिला. परिणामी पुन्हा एकदा मराठीविरुद्ध परप्रांतीय वादाला तोंड फुटले आहे. नोकरीच्या बहाण्याने आलेल्या परप्रांतीय तरुणांना हाताशी घेऊन अबू आझमीसारखे नेते दोन-दोन मतदारसंघातून विधानसभेला निवडून येत आहेत. महाराष्ट्रातील मराठी टक्का संपवण्याचे हे षडयंत्र असून राज्यावर परप्रांतीय नेत्यांचा चाललेला हा विषप्रयोग असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज म्हणाले, आतापर्यंत बहुतेक पंतप्रधान हे उत्तर प्रदेशातून निवडून गेलेले आहेत. तरीही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यातील तरुण नोकरीसाठी महाराष्ट्रात धाव घेत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर पाच वर्षे केवळ उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या तीन राज्यांचा विकास करण्याची विनंती त्यांना करणार आहोत.असेही ते म्हणाले.