जातीयवादाचा शॉर्टकट

आजकाल सर्वांना यशाचा शॉर्टकट हवा आहे. व्यायाम करून शरीर कमावून कुस्ती खेळण्यापेक्षा कुस्तीपुरते शक्तीचे इंजेक्शन घेऊन मैदान मारण्यालाच सगळे टपून बसले आहेत. समाजाशी संपर्क साधून किंवा समाजाच्या हितासाठी  कष्ट करून निवडणुका जिंकण्याऐवजी समाजात जातीयवादी भावना वाढवण्याचा शॉर्टकट अवलंबून त्या जिंकण्याचाच  प्रयत्न सर्वजण करीत आहेत. भारतीय जनता पार्टीला जातीयवादी शक्ती म्हणण्याची प्रथा पडली आहे. भाजपाला दिले जाणारे हे विशेषण खरे नाही भाजपा हा फारतर तो धर्मवादी पक्ष आहे.  पण बाकीचे अनेक पक्ष जातींचे उघड उघड उल्लेख करून राजकारण करीत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेस,  समाजवादी पार्टी, जनता दल (यू), रिपब्लिकन पार्टी, राजद, राष्ट्रीय लोकदल असे सारे पक्ष जातींचे राजकारण करीत असतात आणि तोंडाने मात्र सेक्युलॅरिझमच्या गप्पा मारत असतात. मुस्लिम लीगसारखे काही पक्ष तर सरळ सरळ धर्माचे नावच पक्षाला देत असतात. पण त्यांना कोणी जातीयवादी म्हणत नाही. भाजपाच्या कथित धर्मवादापेक्षा या ढोंगी सेक्युलर पक्षांचा जातीयवाद अधिक धोकादायक आहे आणि अधिक धोकादायक होत जाणार आहे. त्याची बीजे आता सुरू असलेल्या निवडणुकीच्या राजकारणात रोवली गेली आहेत.

पूर्वीच्या काळी कार्यकर्ते विचारांसाठी काम करीत असत. आता तसे कोणी काम करीत नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची चलाखी ओळखली आहे.  आपण ज्यांचा जयजयकार करत फिरतो ते नेते तर कमालीचे स्वार्थी आहेत, देशाच्या कल्याणाच्या गोष्टी बोलत, सेक्युलॅरिझमच्या नावाने निवडणुका लढवतात त्यांच्या तोंडातली ती भाषा नकली असते, हे कार्यकर्त्यांना कळायला लागले आहे. आपला मुलगा, आपली मुलगी, आपला जावई  आणि यातले कोणीच नसतील तर आपले पुतणे यांच्याच कल्याणाचा विषय त्यांच्या डोक्यात असतो. त्यांच्या निवडणुकीचा अजेंडा आणि डावपेचांचे सूत्र तेच असते. मग हे नेते पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रत्यक्षात एवढा स्वार्थीपणा करत असतील तर आपणच आपला स्वार्थ सोडून त्यांच्या मागे फिरायचे कशाला? हा कार्यकर्त्यांचा सरळ सरळ हिशोब झालेला आहे आणि कार्यकर्ते त्याच हेतूने कामाला लागले आहेत. आम्ही तुमच्या पुतण्याला आमदार करता यावे म्हणून घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायच्या असतील तर आम्हाला किमान नगरसेवक म्हणून तरी तिकीट मिळाले पाहिजे आणि ते मिळणार नसेल तर तुमच्या मागे फिरण्यात आम्हाला रस नाही, हा त्यांचा बाणा झालेला आहे. 

खासदारकीच्या निवडणुकीत धडपड करणार्‍या कार्यकर्त्यांत आमदारकीचे इच्छुक आघाडीवर असतात. आमदारकीच्या निवडणुकीत बेंबीच्या देठापासून घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद यासाठी इच्छुक असणार्‍यांचा भरणा असतो आणि या निवडणुकांमध्ये आघाडीवर असणार्‍यांमध्ये सरपंच पदाला इच्छुक असणार्‍यांचा बुजबुजाट झालेला असतो. बहुसंख्य कार्यकर्ते कोणत्या तरी खुर्चीवर नजर ठेवूनच पक्षाचे काम करत असतात. तत्वासाठी काम करणारा आणि खुर्चीवर नजर न ठेवणारा कार्यकर्ता शोधून काढावा लागेल इतका दुर्मिळ झाला आहे. अर्थात कार्यकर्ते फार हुशार झालेले आहेत. प्रत्येकाला खुर्ची मिळणार नाही याचीही जाणीव त्यांना आहे. तेव्हा खुर्ची नाही तर नाही निदान थैली तरी मिळाली पाहिजे या भूमिकेतूनही अनेक कार्यकर्ते काम करत आहेत. अर्थात त्यांची निष्ठा तत्वापेक्षा पैशावर जास्त असल्यामुळे जो जास्त पैसे देईल त्याचा जयजयकार करावा, असे त्यांचे धोरण असते. वरच्या पातळीवरचे नेते या खुर्च्या आणि पैसे मागणार्‍यांमुळे फार अस्वस्थ झाले आहेत. या सगळ्यातून मार्ग काढून निवडून कसे यावे अशी विवंचना त्यांना सतावत आहे. 

खुर्ची मिळणार नाही, पैसा मिळणार नाही तरीही कार्यकर्ता काम करत राहील यासाठी काय करावे यावर त्यांना बुद्धी खर्च करावी लागत आहे.  त्यासाठी कार्यकर्त्यांना जातीच्या अभिमानाने पेटवावे लागते आणि कामाला जुंपावे लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात खुर्ची आणि  पैसा यापेक्षाही  जातीवरून केला गेलेला बुद्धीभेद अधिक  काम करून गेला असल्याचे लक्षात येत आहे. विविध उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात कार्यकर्ता टिकविण्यासाठी जातीय भावनांना मोठीच प्रेरणा दिली आहे. आपल्या जातीसाठी किंवा जातीच्या कल्याणासाठी आपल्या नेत्याला निवडून दिले पाहिजे हा विचार कार्यकर्त्यांच्या मनात भरवून दिला आहे. आपण स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचा विचार केला तर हे वातावरण लक्षात येते. विविध राजकीय पक्षांच्या श्रेष्ठींनी सुद्धा जातींचा विचार करूनच तिकिटांचे वाटप केलेले आहे. तेच सूत्र पुढे नेऊन या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तरुणांच्या मनात जातीचे विष पेरले. ब्राह्मण, मराठा, लिंगायत, वंजारी, दलित, मातंग, चर्मकार आणि विविध भागात प्रभावी असलेल्या जातींचे राजकारण करताना दुसर्‍या जातींविषयी द्वेष निर्माण केला. त्यामुळे कदाचित त्यांचा आजचा स्वार्थ साधला गेला असेल, पण निवडणुका संपल्या तरी हे विष उतरत नाही आणि समाजाच्या अंगाअंगात कायम भिनत राहते याची जाणीव या नेत्यांना नाही.

Leave a Comment