मतदारांची नावे वगळल्याचे प्रकरण न्यायालयात

पुणे  – मतदार यादीतून अचानक नावे गायब झाल्याने मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. वंचित मतदारांना मतदानाची संधी मिळावी आणि तोपर्यंत पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचा निकाल राखून ठेवण्यात यावा; अशी मागणी करणारी याचिका प्रताप गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. 

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात दि. 17 रोजी मतदान झाले. ऐन मतदानाच्या वेळी मतदार यादीत आपले नावच नसल्याचे हजारो मतदारांच्या लक्षात आले. त्यामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. या प्रकाराने संतप्त झालेल्या मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवून याबाबत जाब विचारला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनीही हा मुद्दा उचलून धरला. सुरुवातीला या प्रकाराला विरोधकांचा कट म्हणून फटकारणारे काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्‍वजीत कदम यांनीही या बाबतचा जनक्षोभ लक्षात घेऊन याबाबत चौकशीची मागणी केली.

भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन निवडणूक आयोगाकडे वंचित मतदारांची कैफियत मांडून आले. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रा. सुभाष वारे यांनीही वंचित मतदारांची बाजू उचलून धरली. मात्र या प्रकरणामध्ये आता सर्व राजकीय पक्ष सक्रीय झाले असले तरीही या गैरप्रकाराला तोंड सर्वसामान्य मतदारांनी स्वयंस्फूर्तीने फोडले आणि आजही मतदारांनी पक्षातीतपणे हे प्रकरण लाऊन धरले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मतदारांची नावे वगळण्याच्या प्रकरणाला उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.