देशातील एकमेव मौल्यवान मतदार

गुजराथच्या गीर सिंह अभयारण्यातील मतदार महंत भगवानदास दर्शनदास हे देशातील सर्वाधिक मौल्यवान मतदार आहेत कारण त्यांच्या एकट्यासाठी निवडणूक आयोग दर निवडणुकीच्या वेळी त्यांच्या मतदारसंघात म्हणजे बाणेज मध्ये स्वतंत्र मतदान बूथ उघडतात. ऐकून नवल वाटत असले तरी हे सत्य आहे आणि पूर्णपणे कायदेशीरही.

मिळालेल्या माहितीनुसार जुनागढ लोकसभा मतदारसंघातील गीर अभयारण्यात बाणेज या वस्तीत असलेल्या बाणेज तीर्थधाम या शंकराच्या मंदिराचे पुजारी भगवानदास हे तेथील एकमेव रहिवासी आहेत. निवडणक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही मतदाराला मतदानासाठी २ किमी पेक्षा जास्त अंतर जावे लागू नये असा नियम आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ४-५ निवडणूक अधिकारी मतदानाच्या सर्व सामग्रीसह म्हणजे मतदान यंत्रांसह ३५ किमीचा प्रवास करून येथे येतात. मतदान बूथ मांडतात. फक्त बाकी मतदान केंद्रांप्रमाणे मतदानाची वेळ संपेपर्यंत त्यांना येथे थांबावे लागत नाही. भगवानदास यांच्या बोटाला शाई लावल्यावर यांनी बटण दाबून मत दिले की मतदान केंद्राचा पसारा गुंडाळला जातो.

भगवानदास यांनी याप्रमाणे २००४, २००९ च्या लोकसभा मतदानासाठी तसेच २००७ व २०१२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान केले आहे आणि यावर्षींही ३० एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानात ते आपला हक्क बजावणार आहेत.

Leave a Comment