महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकात राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या वाढत्या संपत्तीकडे मतदारांचे लक्ष वेधताना महात्मा फुलेंचे अनुयायी म्हणवून घेणा-या भुजबळांनी नाशिकात उभारलेल्या नॉलेज सिटीला महात्मा फुलेंचे नाव द्यायच्या ऐवजी स्वताचे छगन भुजबळ नॉलेज सिटी असे नाव का दिले असा रोखठोक सवालही केला. या टीकेला उत्तर म्हणून भुजबळ आपल्या विरोधात किणी प्रकऱणा काढणार असे सांगत मतदारांना त्यांनी अगोदरच सावधे केले होते.
शिवसेनेचा वाघ म्हणून छगन भुजबळ यांची ओळख होती. बेळगाव सीमाप्रश्नातील आंदोलनात ते चमकले. त्यात त्यांनी मारही खाल्ला आणि त्याचे फळ म्हणून सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुंबईचे महापौर पद आणि आमदारकी दिली. ते दुस-यांदा आमदार झाल्यावर त्यांनी ठाकरेंना सोडले आणि शरद पवारांना जवळ केले. तेव्हापासून म्हणजे गेली 22 वर्षे भुजबळ हे पवारांच्या बरोबर आहेत.
समता परिषद स्थापन करून भुजबळांनी महाराष्ट्रातील माळी समाज एकत्र करण्याचा प्रय़त्न केला. त्याला सुरूवातीला खतपाणी पवारांनी घातले नंतर त्याचे प्रस्थ वाढत असल्याचे बघून त्याबद्दल बोलणेच बंद केले. शिवसेनेच बाळासाहेबांनी महाराष्ट्राचे नेते म्हणून प्रोत्साहन दिलेल्या भुजबळांना पवारांनी माळी समाजाचे नेते म्हणून बंदिस्त करून ठेवले.
सुरूवातीला भुजबळांना गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद दिले. नंतर त्यांना दुय्यम दर्जाची आणि निधी नसलेली पद देत आहेत. आजही भुजबळ सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन खात्याचे मंत्री आहेत. ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेच्या मैदानात उतरण्याची घोषणा करणारे पवार फक्त भुजबळांनाच यात उतरवू शकले. इतरांनी हा प्रस्तावच धुडकावला आहे.
स्वताला महात्मा फुलेंचे अनुयायी म्हणवून घेणा-या भुजबळांच्या प्रेऱणेने पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी झाली. पण त्यावेळी नाशिकात भुजबळ यांच्या शैक्षणिक संस्था उभ्या रहात होत्या. त्यातील नॉलेज सिटीला मात्र भुजबळ यांनी महात्मा फुले यांचे नाव न देता छगन भुजबळ नॉलेज सिटी असे नाव दिले आहे. फक्त राजकीय लाभासाठीच पवार, भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या नावाचा वापर केल्याचे या एकाच कृतीतून दिसते. इतक्या शिक्षण संस्था असूनही त्यापैकी एकही संस्थेला महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांचे नाव छगन भुजबळ यांनी दिलेले नाही हे दुर्दैव.
गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागताना शरद पवार आणि त्यांचे सगळे अनुयायी, समर्थक हे शाहू फुले आंबेडकरांचे नाव पदोपदी घेतात आणि मत मिळवतात. एकदा का मत मिळाली की त्यांना सोयिस्करपणे विसरतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार यांनी काढलेल्या एकाही संस्थेला त्यांनी राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेले नाही. भुजबळ त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भुजबळ कुटुंबाचीच नावे सगळीकडे चिकटवत चालले आहेत. थोर व्यक्ती किंवा आर्दश असलेल्यांची नावे दिली की पैसा मिळवता आला नसता आणि मालमत्ताही वाढली नसती हे त्यामागचे खरे इंगित आहे.