शेळी आणि सांडणीचे दूध सर्वात उत्तम

कोणतेही दुभते जनावर जे काही खाते तसे दूध देते. म्हणजे त्याच्या चार्‍याचे अनेक गुणधर्म त्याच्या दुधात उतरत असतात. गायीला आपल्या धर्मात माता आणि तेहतीस कोटी देवांचे वसतिस्थान मानले जात असले तरी तिचे दूध काही वेळा ङ्गार धोकादायक असते कारण ती मानवी विष्ठा खात असते. त्यातून जंता सारख्या परोपजीवी प्राण्यांची अंडी तिचे दूध पिणार्‍या मुलांच्या पोटात जात असतात. याउलट शेळी ही अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती  खाऊन येते आणि त्या वनस्पतींचे सारे गुणधर्म तिच्या दुधात उतरतात.  शेळीचे दूध प्राशन करणारांना या औषधी गुणधर्मांचा ङ्गायदा होत असतो. म्हणून गाय हा प्राणी आपल्याला कितीही पवित्र वगैरे वाटत असला तरीही गायीपेक्षा शेळीचे दूध अधिक औषधी गुणधर्मांनी युक्त असते. मात्र त्या दुधाला एक उग्र दर्प येत असतो म्हणून लोक ते दूध टाळत असतात. 

वास्तविक हा दर्प त्या दुधाचा नसतो तर तो बोकडाचा असतो. दूध देणार्‍या शेळीपासून बोकड लांब बांधला तर हा दर्प येत नाही. असाच जनावराच्या चार्‍याचा आणि दुधाचा गुणधर्म समान असल्याचे सांडणीच्या (मादी उंट) बाबतीत दिसून आले आहे. उंट आणि सांडणीला वाळवंटातले जहाज म्हटले जात असते. वाळवंटात रहात असल्यामुळे त्यांचा चारा आणि जीवनपद्धत वेगळीच तयार झालेली आहे. या प्राण्याला त्या वाळवंटात कोरडा पाला खाऊन जगावे लागते आणि त्या पाल्याचे अनेक गुणधर्म त्याच्या दुधात उतरत असतात. हा प्राणी कडुलिंबाचा पाला खात असतो. हा पाला जगातला सर्वात अधिक औषधी गुणधर्माचा पाला समजला जातो. त्यामुळे सांडणीचे दूध पिणारांना कडुलिंबाच्या सार्‍या औषधी गुणधमार्र्ंचा लाभ होतो. 

बिकानेर जिल्हत करण्यात आलेल्या  एका पाहणीत याचा अनुभव आला होता. या जिल्ह्यात उंटांचे पालन करणारी एक जमात आहेे. या जमातीत सांडणीचे दूध विकणे हे मोठे पाप समजले जाते. त्यामुळे तिचे मिळेल तेवढे दूध मुलांना पाजले जाते.   या जमातीत मधुमेहाचे रुग्ण आढळले नाहीत. त्याचा आणि सांडणीच्या दुधाचा काही संबंध आहे का याचा शोध घेतला असता तसा तो असल्याचे आढळले. त्यावरून संशोधकांनी सांडणीच्या दुधावर अधिक संशोधन केले असता हे दूध अनेक पोषण द्रव्यांनी युक्त असल्याचे आढळले. गाय आणि म्हैस यांच्या दुधापेक्षा ते सकस असल्याचे त्यांना दिसले. या दुधात ब जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप असल्याचेही त्यांना दिसले. या दुधात त्यांना आणखी असे काही गुणधर्म दिसले आहेत की, त्यामुळे या दुधाचा सौंदर्य प्रसाधने तयार करतानाही चांगला उपयोग होणार आहे. सांडणीच्या दुधामुळे रोग प्रतिकारक शक्तीही वाढते असाही दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. एकंदरीत जैव तंत्रज्ञानामुळे या उपेक्षित प्राण्यालाही महत्त्व आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही