मराठी चित्रपटांची भरारी

कोणत्याही क्षेत्रामध्ये दर ३० वर्षांनी नवी पिढी येत असते असे गृहित धरले तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पिढी बदलण्याची ही प्रक्रिया नक्कीच घडली आहे असे म्हणावे लागेल. कारण १९८० च्या दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी जगवण्यासाठी काहीतरी करण्याचे आवाहन या क्षेत्रातले लोक सरकारला करत होते. अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणारी ती पिढी आता मागे पडली आहे आणि ३० वर्षांनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारी पिढी आता पुढे आलेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतला हा बदल मनाला आनंद देणारा आहे आणि या बदलाला राष्ट्रीय चित्रपट मंडळानेसुध्दा सलाम केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात पाच मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळवले आहेत. दोन वर्षापूर्वी जोगवा या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला तेव्हा मराठी भाषिकांना आनंद झाला होता. यावर्षीही त्याची पुनरावृत्ती झाली असून मराठीतल्या पाच चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवरच्या विविध पुरस्कारांवर आपला हक्क सांगितला आहे. मराठी चित्रपटसृष्टी अक्षरशः झळाळत आहे.

एकापेक्षा एक ऑफबीट चित्रपट मराठीत निर्माण व्हायला लागले आहेत आणि ते प्रेक्षकांनाही आवडायला लागले आहेत. दादा कोंडके यांच्या सोंगाड्याप्रमाणे हे चित्रपट एका चित्रपटगृहात वर्षभर चालले असे काही विक्रम झाले नाहीत पण हे चित्रपट निर्माते लाखाच्या आणि कोटीच्या गोष्टी नक्कीच करायला लागले आहेत. १९८० च्या दशकात झालेली कोंडी ३० वर्षांनी का होईना फुटली आहे. मराठी चित्रपट निर्मात्यांनी त्या नंतर वळू, विहिर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, नटरंग असे एकापेक्षा एक आगळे वेगळे चित्रपट निर्माण झाले आहेत. ही वाटचाल केवळ व्यावसायिकतेच्या बाबतीतच सुरू झाली असे नाही. तर सामाजिकदृष्ट्या अतीशय संपन्न असा आशय या चित्रपटांनी मांडलेला आहे. गेल्या आठवड्यात पुरस्कार जाहीर झालेले हे पाचही चित्रपट या आशयाच्या अंगानेच अधिक उठून दिसतात. केवळ मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये हे आगळे वेगळे वळण आहे. फँड्री, आजचा दिवस माझा, यलो, अस्तु आणि तुह्या धर्म कोंचा या पाच मराठी चित्रपटांनी अनुक्रमे दिग्दर्शन, पार्श्‍वगायन, अभिनय, कथा आणि संगीत अशा विविध विभागातील पुरस्कार मिळवले आहेत. मराठी चित्रपटांच्या दुनियेचा १९८० चा काळ आठवला की आपण कोठून कोठपर्यंत आलो आहोत याचा अनुभव येऊन आश्‍चर्यही वाटते आणि आनंदही वाटतो.

१९८० साली चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने तत्कालीन मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन सरकारने चित्रपटसृष्टी टिकवण्यासाठी काहीतरी मदत करावी अशी करूणा भाकली होती. मराठी चित्रपट चालत का नाहीत, त्यांना पुरेसे पैसे का मिळवता येत नाहीत असे प्रश्‍न तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच विचारले होते. त्या काळात तेलुगु आणि तमिळ चित्रपटांनी हिंदीच्या बरोबरीने भव्यदिव्य चित्रपट निर्मिती करून प्रचंड गल्लाभरूपणा केलेला होता. त्यामुळे मराठी चित्रपट निर्माते मदतीची याचना करायला लागले की नेते मंडळी त्यांच्यासमोर ही उदाहरणे ठेवत असत आणि ही वस्तुस्थितीही होती की मराठी कसे प्रचंड खर्च करून निर्माण केले जाणारे चित्रपट तयार करण्याचे साहस कोणी करत नव्हते. अशा परिस्थितीवर एक उतारा असतो तो म्हणजे लो बजेट चित्रपट तयार करून ते अधिक लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करणे. मात्र अशा लो बजेट चित्रपटांना मराठी रसिक फार प्रतिसाद देत नसत.

एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टी एका दुष्टचक्रात सापडली होती. नंतर तर टी. व्ही.चे आकर्षण वाढत गेले आणि मराठी चित्रपटांना अक्षरशः अवकळा यायला लागली. एखाद्या निर्मात्याने प्रचंड साहस करून एक गाव बारा भानगडी, पिंजरा असा चित्रपट तयार केला की त्याला मात्र लोकांचा आसरा मिळत असे. पण असले चित्रपट अपवादच. मात्र २१ व्या शतकात पदार्पण करताना मराठी चित्रपटांनी अक्षरशः कात टाकल्यागत मरगळ झटकून टाकली. चित्रपट करायचा झाला तर तो ग्रामीण पार्श्‍वभूमीवर तरी असावा किंवा त्यात तमाशा तरी असावाच या कल्पनेच्या बाहेर पडून निरनिराळे विषय हाताळणारे ताज्या दमाचे मराठी चित्रपट निर्माते पुढे आले आणि त्यांनी खरोखर किमया केली. तेथून सुरू झालेली ही वाटचाल आता फँड्रीपर्यंत आली आहे. २० वर्षांपूर्वी चित्रपटांच्या कथानकांचे फॉर्म्युले ठरलेले होते. त्यात गावचा पाटील, नर्तिका, एक गरीब कुटुंब असा मसाला भरलेला असे. अशा या काळामध्ये वेगळ्या आणि निरनिराळ्या कथानकांवर चित्रपट निघू शकतील यावर कोणी विश्‍वासच ठेवला नसता. पण अशा विषयावरचे चित्रपट आता सर्रास निघायला लागले आहेत आणि ते फार मोठा गल्ला जमा करू शकत नसले तरी जगण्यापुरते उत्पन्नही मिळवून देत आहेत आणि चित्रपट विषयक अभिरूची विकसित झालेल्या मराठी प्रेक्षकांचे समाधानसुध्दा करत आहेत. टी. व्ही.चे आकर्षण संपल्यानंतरचा हा काळ आहे.

श्‍वास नावाचा एक चित्रपट मराठीत निर्माण झाला. डोळ्याचा कर्करोग झालेला एक नातू आणि त्याचे आजोबा यांची मानसिक घालमेल. अशा विषयावर चित्रपट काढण्याची कल्पनासुध्दा कोणी २० वर्षांपूर्वी करू शकले नसते. अशा प्रकारचा एक प्रयोग रामदास फुटाणे यांनी सामनाच्या रूपाने केला होता. तो चित्रपट आपटला. मात्र फ्रान्समधल्या एका चित्रपट महोत्सवात त्याचे भरभरून कौतुक झाले. हा काय प्रकार आहे हे लोकांना कळेना. मात्र एवढेच कळले की परदेशात ज्या चित्रपटाचे कौतुक होते तो महाराष्ट्रात आपटतो. त्यामुळे पुन्हा असा प्रयोग कोणी केला नाही. जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगवान झाली आणि हळूहळू का होईना पण परदेशी चित्रपट महोत्सवात कौतुक होऊ शकणारे चित्रपट महाराष्ट्रातसुध्दा चांगले चालू शकतील असे वातावरण निर्माण झाले. श्‍वास या चित्रपटाने ऑस्करचे नॉमिनेशन मिळवले. तो मराठी चित्रपटांसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला. तिथून फँड्रीपर्यंत झालेला प्रवास खरोखर कौतुकास्पद आहे.

Leave a Comment