पाकिस्तानात पत्रकाराच्या हत्येचा प्रयत्न

पाकिस्तानच्या जिओ टीव्ही या वाहिनीचे प्रतिनिधी हमीद मीर यांच्या हत्येचा प्रयत्न फसला आहे. त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने दक्षता घेतल्यामुळे जीव वाचला. हमीद मीर हे सत्ताधारी वर्गाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या धाडसाने प्रसिद्ध करणारे पत्रकार म्हणून सर्वांना ज्ञात होते. त्यांनी २००१ साली ओसामा बिन लादेनची मुलाखत घेतली होती. अफगाणिस्तानातल्या दर्‍या-खोर्‍यात जाऊन लादेनची ही मुलाखत त्यांनी घेतली होती. पाकिस्तान सरकारने हमीद मीर यांच्यावर वारंवार निरनिराळ्या प्रकारचे निर्बंध जारी केले होते पण त्यांना न जुमानता ते धाडसीपणाने आपल्या कामात मग्न राहिले. 

हमीद मीर याच्या घरामध्ये पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. त्याचे वडील पत्रकार होते आणि मोठा भाऊ सुद्धा पत्रकार आहे. त्यांच्या वडिलांचा मृत्यू सुद्धा मोठ्या वाईट अवस्थेमध्ये गूढरित्या झालेला आहे. ते पाकिस्तानी लष्करावर सातत्याने टीका करीत असत, त्यामुळे लष्करी अधिकार्‍यांनी त्यांना विषप्रयोग करून मारले असा प्रवाद आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी हमीद मीर पत्रकार झाला. त्याने वयाच्या २९ व्या वर्षी एका उर्दु दैनिकाचा संपादक होण्याचा मान मिळवला होता.

त्याचे दोघे भाऊही पत्रकार आहेत. त्याची पत्नी सुद्धा टी.व्ही.वरच काम करते. हमीद मीर याने गेल्या काही दिवसांपासून आयएसआय आणि तालिबानी संघटनांना टीकेचे लक्ष्य केले होते. गेल्या वर्षी पाकिस्तानात मलाला युसूफझाई या मुलीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तो मलालाच्या बाजूने उभा होता. या दोन्ही संघटना हमीद मीरवर खार खाऊन होत्या.

त्याचा कोणत्याही क्षणी खून होऊ शकतो हे त्याच्या कुटुंबाला माहीत होते आणि यापूर्वी त्याला अनेकदा खुनाच्या धमक्या आलेल्या होत्या. त्याच्या मोठ्या भावाने याची कल्पना सरकारला दिली होती, पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत होते. पाकिस्तानात  १९९० पासून ५० पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत आणि त्यातल्या एकाही हल्ल्याचा शोध लागलेला नाही. २०१३ या एका वर्षात पाच नामवंत पत्रकारांच्या हत्या झाल्या.