मॅक्सवेल –मिलरची तुफानी फटकेबाजी

अबुधाबी – आयपीएलचा सातवा हंगाम सुरू झाल्यानंतर प्रथमच रोमहर्षक सामना पहावयास मिळाला. चेन्नई सुपरकिंग्जने उभे केलेल्यास तगडया आव्हानाला किंग्ज इलेव्हन पंजाबने जशास तसे उत्तर देत सामना जिंकला. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेल व डेव्हिड मिलर यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे त्यांना हा सामना जिंकता आला. ४३ चेंडूंत ९५ धावा चोपून काढणारा मॅक्सवेल ‘सामनावीर’ ठरला.

चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीवीर ड्वेन स्मिथ व ब्रॅन्डन मॅक्कलम या दोघांनी १२३ धावांची भागीदारी केली. स्मिथने ६६, तर मॅक्कलमने ६७ धावा फटकावल्या. तिस-या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुरेश रैनाने २४, तर महेंद्रसिंग धोनीने २६ धावा केल्या. त्यामुळे २० षटकात चेन्नई सुपरकिंग्जला २०५ धावा चोपता आल्या. यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने ४३ धावा देत दोन फलंदाजांना बाद केले.

२०५ धावाचे आव्हान पेलताना किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरूवात निराशाजनक झाली. चेतेश्वार पुजारा व वीरेंद्र सेहवाग यांनी तीन षटकांमध्ये ३१ धावांची भागीदारी रचल्यानंतर. आशीष नेहराने सेहवागला, तर रविचंद्रन अश्विनने पुजाराला बाद केले. त्यानंतर अश्विनने अक्षर पटेललाही झटपट बाद केले. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबची अवस्था ३ बाद ५२ अशी झाली होती. या धावसंख्येवरून मॅक्सवेल व मिलर यांनी पुढे खेळायला सुरुवात केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. दोघांनी चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मॅक्सवेलने दोन षटकार व १५ चौकारांची आतिषबाजी केली. मिलरने ३७ चेंडूंत प्रत्येकी तीन षटकार व चौकारांनिशी नाबाद ५४ धावा चोपून काढल्या. त्याला कर्णधार जॉर्ज बेलीने नाबाद १७ धावा करीत उत्तम साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जवर ६ गडी व ७ चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळवला.

Leave a Comment