आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित काटेकोर सुरक्षा प्रदान करीत असल्याचा बँकेचा दावा

मुंबई – देशातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर इतर खातेदाराची प्राथमिक माहिती उपलब्ध असल्यास त्या आधारे त्या खात्याचा तपशील (स्टेटमेंट) खातेदाराखेरीज त्रयस्थ व्यक्तीही काढू शकत असल्याची बाब आयुष घोष या तरुणाने लक्षात आणून दिली आहे. एकीकडे बँकेने आपल्या ऑनलाईन सुरक्षेबाबत खात्री व्यक्त केली असली तरीही हा तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नेट बँकींग सुविधेत लॉग इन केल्याखेरीज स्टेटमेंट मिळणे सध्यातरी थांबविण्यात आले आहे. 

या संदर्भात खुलासा करताना बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की; आमच्या तंत्रज्ञांच्या पथकाने बँकेची संपूर्ण वेबसाईट काळजीपूर्वक तपासली असून ग्राहकांच्या खात्यावरील माहिती आणि व्यवहारांचा तपशील सुरक्षित आणि गोपनीय रहाण्यासाठी सर्व प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र नेट बँकींगमध्ये लॉग इन न करता काही ग्राहकांच्या व्यवहाराचा तपशील इतरांना मिळत असल्याचा प्रकार घडत असेल; तर त्याबाबत त्वरित तपासणी करून त्रुटी तातडीने सूर करण्यात येईल; अशी ग्वाही त्यांनी दिली. 

घोष यांना आपले स्वत:चे बँक खाते ऑनलाईन वापरत असताना या धक्कादायक गोष्टीचा शोध लागला. या प्रकाराबाबत त्यांनी बँकेला इ मेलद्वारे माहितीही दिली आहे. बँकेचे खातेदार सहजपणे शेअर करीत असलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे नाव; पत्ता यासह त्यांच्या खात्यावरील जमा आणि खर्चाच्या व्यवहारांचा तपशील त्रयस्थ व्यक्तीला उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी हॅकींग अथवा कोडींगचे तंत्र अवगत असण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर आहे; असे मत घोष यांनी नोंदविले. 

हे प्रकार जागतिक पातळीवरील बॅकींगच्या ऑनलाईन सेवांमध्ये अनेक वेळा दिसून आले असून यामुळे बँक अथवा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाही; असे सायबर सुरक्षा क्षेत्रातील सल्लागार डॉम्निक के यांनी स्पष्ट केले. मात्र आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपला पासवर्ड सुरक्षित आणि सहज लक्षात येणार नाही; असा ठेवणे; तो वेळोवेळी बदलणे; आपल्या व्यवहारांना बहुस्तरीय सुरक्षा प्रदान करणे; आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे; या बाबी अमलात आणणे आवश्यक आहे; याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

Leave a Comment