समुद्रतळातील खडकांपासून बनणार स्मार्टफोन

बर्लीन – भविष्यात समुद्र तळात खोलवर असलेल्या खडकांपासून स्मार्टफोन बनतील असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. जर्मन वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफोन बनविण्यासाठी लागणारी दुर्मिळ संयुगे समुद्र तळातील खडकांत मुबलक प्रमाणात आहेत आणि खडकांपासून ही संयुगे वेगळी करण्याचे तंत्रज्ञान जर्मन शास्त्रज्ञांनी यशस्वीपणे विकसित केले आहे.

पृथ्वीवर सापडणारे पेट्रीयम, प्रोसोडिनियम, डायस्प्रोसियम या पदार्थांची उपलब्धता प्रचंड वापरामुळे कमी होत चालली आहे. मात्र हे पदार्थ समुद्राच्या तळात असणार्‍या खडकांत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने भविष्यात बनविले जाणारे स्मार्टफोन तसेच अन्य उपकरणे समुद्र खडकांपासून बनविली जातील. फॅरोमॅगनीज या नावाचे हे खडक शतकानुशतके लोह आणि मँगेनीज यांच्या डिपॉझिटमुळे तयार होतात. स्मार्टफोनसारखी उपकरणे बनविण्यासाठी लागणारे पदार्थ किवा संयुगे या खडकातून वेगळी करण्याचे तंत्रज्ञान जर्मन संशोधकांनी विकसित केले आहे.