सीलँड – जगातील सर्वात छोटा स्वघोषित देश

ईंग्लंडजवळच्या उत्तर समुद्रात प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड नावाचा स्वघोषित देश असून तो जगातील सर्वात चिमुकला देश आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात उभारल्या गेलेल्या टॉवररूपी किल्ल्यात या देश असून त्यात निवृत्त ब्रिटीश आर्मी जनरल पॅडी बेटस व त्याचे कुटुंबिय आणि नातेवाईक इतकेच लोक राहतात. पॅडीने स्वतःला सीलँडचा रॉयल हायनेस म्हणून घोषित केले होते आणि वयाच्या ९१ व्या वर्षी २०१२ मध्ये तो मरण पावला.

या देशाचे क्षेत्रफळ अवघे ५५० चौरस मीटर इतकेच असून देशाची लोकसंख्या ३० च्या वर कधीच गेलेली नाही. या देशाला अन्य देशांनी मान्यताही दिलेली नाही. मात्र जगभरात वेळोवेळी झालेल्या वादविवादात हा मायक्रो देश अनेक वेळा केस स्टडी म्हणून चर्चेत आला आहे. या देशात खाण्यापिण्यासह सर्व सामग्री ऑनलाईन मागविली जाते आणि हेलिकॉप्टरने ती डॉकवर उतरविली जाते.

या देशाचा इतिहास असा की १९४३ च्या दुसर्‍या महायुद्धात युके ने मोन्सेल या नावाने ठिकठिकाणी अनेक किल्ले बांधले. त्यांचा उद्देश जर्मन विमानांचा वेध घेणे हाच होता. हे किल्ले आंतरराष्ट्रीय सीमेवर बांधले गेले होते. सीलँडही असाच आंतरराष्ट्रीय सीमेवर समुद्रात आहे. युद्धकाळानंतर येथे १५० नेव्ही अधिकारी राहात होते नंतर त्यांनी हा किल्ला खाली केला. त्यांनतर त्याचा वापर पायरेट रेडिओ साठी होत होता मात्र आर्मी अधिकारी पॅडीने या पायरेटस ना हाकलून लावले आणि स्वतः किल्ल्याचा ताबा घेतला.

पॅडीने वकीलाच्या सल्ल्याने हा किल्ला स्वतंत्र देश असल्याचे घोषित केले. देशाचा झेंडा डिझाईन केला, राष्ट्रगीत लिहिले इतकेच नव्हे तर चलन आणि पासपोर्टही बनविले. सीलँड डॉलर नावाने असलेले देशाचे चलन जगात कठेही ग्राह्य मानले जात नाही. विशेष म्हणजे २००७ ते २०११ या काळात तीन वेळा हा देश ९०६ दशलक्ष डॉलर्सला विक्रीसाठी ठेवण्यात आला पण त्याला एकही ग्राहक मिळाला नाही.

विशेष म्हणजे या देशाची अधिकृत वेबसाईट आहे आणि त्यावर देशाचा इतिहास लिहिला गेला आहे. बेल्जियम आणि ब्रुसेल्स बरोबर या देशाची पोस्टेज स्टँप सेवा सुरू असून बेल्जिमयने हे स्टँप ग्राह्य धरले आहेत.

Leave a Comment