युक्रेनप्रश्नी रशिया नरमले

किव्ह – रशियन समर्थकांवरील युक्रेनच्या कारवाईमुळे संतापलेल्या रशियाने गृहयुद्धाची धमकी दिल्याच्या दुसर्‍याच दिवशी नरमाईची भूमिका घेतली. हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सुटेल, असा पवित्रा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घेतला. दुसरीकडे अमेरिकेने दिलेल्या इशार्‍यामुळेच रशियाला आपल्या आक्रमकतेला आवर घालावा लागल्याचे सांगितले जाते.  

युक्रेनच्या पूर्वेकडील सीमेवर रशियन फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. त्या अगोदर प्रांतातील दहाहून अधिक शहरांवर रशियन समर्थकांनी ताबा मिळवल्यानंतर युक्रेनने लष्करी कारवाई केली. त्यामुळे रशियाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर युक्रेन गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा देण्यात आला होता. रशियन समर्थकांवर बळाचा वापर करू नये, असे सांगून रशियाने लष्करी कारवाईचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला. त्यानंतर रशियाने गुरुवारी आपल्या आक्रमकतेला आवर घालताना चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी दर्शवली. टीव्हीवरील एका कार्यक्रमातून व्लादिमीर पुतीन यांनी फोनवरून चर्चेची मागणी केली. या समस्येवर केवळ चर्चा हाच तोडगा असू शकतो. ही लोकशाही पद्धत आहे. त्यांची ही नवी भूमिका सरकारी वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली.