पाकिस्तानात लायब्ररीला ओसामाचे नांव

इस्लामाबाद – अलकायदाचा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या नावाने लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी मदरसा चालविणार्‍या वादग्रस्त कट्टरवादी इस्लाम गुरू मौलाना अब्दुल अजीन यांनी लायब्ररीसाठी ओसामाचे नांव त्याच्या सन्मानार्थ दिले आहे. मौलाना अब्दुल हे लाल मशीदीचे इमाम आहेत. याच मशीदीवर माजी राष्ट्रपती आणि आता देशदा्रोहाचा गुन्हा दाखल असलेले परवेझ मुशर्रफ यांनी सैन्य कारवाई केली होती.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार मौलाना म्हणाले की दुसर्‍यांसाठी ओसामा दहशतवादी असला तरी इस्लामसाठी तो हिरो आहे आणि तो शहीद झाला आहे. त्यामुळे आमच्या मनात त्याचे स्थान अव्वल आहे. मुक्तबाह ओसामा बिन लादेन शहीद असेच लायब्रारीचे नामकरण करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या सील कमांडोनी ओसामाला पाकच्या अबोटाबाद भागात २ मे २०११ साली गुप्त कारवाई करून ठार केले होते.