झोपावे कधी आणि किती?

आरोग्य उत्तम असावे असे सर्वांनाच वाटते. मात्र उत्तम आरोग्यासाठी काय आवश्यक आहे असे विचारल्यास पटकन उत्तर दिले जाते, उत्तम आरोग्यासाठी उत्तम झोप आवश्यक आहे. म्हणजे उत्तम झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की, उत्तम आरोग्य कशावरून ओळखावे? ज्याला उत्तम झोप लागते त्याचे आरोग्य उत्तम, असे खुशाल समजावे. म्हणजे झोप हे उत्तम आरोग्याचे साधनही आहे आणि उत्तम आरोग्याचे लक्षण सुद्धा आहे. मग झोप कशी घ्यावी, किती घ्यावी असे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. लंडनमध्ये एका मानसशास्त्रज्ञाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आलेले आहे की, जे लोक रात्री बरोबर दहा वाजता झोपतात त्यांचे आरोग्य उत्तम असते. तसे सगळेच लोक दहा वाजता झोपू शकत नाहीत. कारण प्रत्येकाच्या व्यवसायाचे स्वरूप वेगळे असते. मात्र ज्यांना शक्य असेल त्यांनी रात्री दहाच्या आत झोपण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला तानिया जॉन्स्टन यांनी दिला आहे. 

खरे म्हणजे दहाला झोपून सहाला उठलो की, आरोग्य चांगले राहते हे सर्वांनाच माहीत आहे. पण दहा वाजता झोपच येत नाही. बळबजरीने दहा वाजता अंथरुणावर पडलोच तर लवकर झोप लागत नाही आणि लागली तरी सात-आठ तास शांत झोप होत नाही. मधेच झोप चाळवली जाते. एकदा मधेच जाग आली की, नंतर तासभर झोप येत नाही. काही काही लोकांना तर मधेच बारा-एक वाजता जाग येते आणि नंतर पहाटेपर्यंत ते टक्क जागे राहतात. यावर काय इलाज करावा? तानिया जॉन्स्टन यांचा सल्ला असा आहे की, झोप कशी लागावी हे झोपेपूर्वीच्या तीन-चार तासातील घटनांवर अवलंबून असते. आपण संध्याकाळचे जेवण किती वाजता घेतो आणि दिवसातला शेवटचा चहा कधी घेतो यावर आपली झोप किती शांत असेल हे अवलंबून असते. त्यामुळे तानिया जॉन्स्टनच्या मते रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन तास आधी केले पाहिजे. 

म्हणजे उशीरात उशीरा साडे आठ वाजता जेवण संपले पाहिजे आणि अन्न पचनाची प्रक्रिया बरीचशी पूर्ण झालेली असली पाहिजे. अन्यथा नऊ साडेनऊ वाजता जेवण करून दहा वाजता झोपायला गेेलो तर पोटात गडबड सुरू राहते आणि झोप शांत लागत नाही. त्याचबरोबर रात्रीचे जेवण हलके असावे, हेही आवश्यक आहे. रात्रीचा चहा कधी घ्यावा? दिवसातला शेवटचा चहा नऊ वाजता घ्यावा. उशीरात उशीरा नऊ वाजता घ्यावा. खरे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर चहा, कॉङ्गी असे उत्तेजक पेय पिऊच नये. कारण उत्तेजक पेयाने तरतरी येत असते आणि झोप उडत असते. म्हणून नाईलाज झाला तरच ङ्गार तर नऊ वाजता चहा घ्यावा. त्यानंतर चहा घेतल्यास दहा वाजता झोपच लागत नाही. तेव्हा खाण्या-पिण्याची पथ्ये पाळूनच झोपेची उत्तम आराधना करावी लागते आणि तरच आरोग्य चांगले राहते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment