अण्णांना अज्ञात इसमाकडून फोनवरून धमकी

पुणे – ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांना फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याचे वृत्त असून तशी तक्रार पारनेर पोलिस ठाण्यात नोंदविली गेली असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार ९ एप्रिल आणि १६ एप्रिल या दोन्ही दिवशी अण्णांना धमक्या दिल्या गेल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून अण्णांच्या कार्यालयातील लँडलाईनवर फोन करून उस्मानाबादचे उमेदवार पद्मसिंह पाटील निवडणुकीत पराभूत झाले तर तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना पाहून घेऊ अशी धमकी दिली असल्याचे अण्णांचे सहकारी शाम पठाडे यांनी सांगितले. धमकी देणार्‍यांनी पद्मसिंह पाटील याच्याविरोधात अण्णांनी प्रचार करू नये असेही बजावले होते.

अण्णांनी पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर प्रथम ९ एप्रिल रोजी पहिली धमकी दिली गेली.मात्र खोडसाळपणाचा प्रकार असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. दुसरी धमकी मिळाल्यानंतर मात्र अण्णांच्या कानावर सारा प्रकार घातला गेला आणि त्यांच्या संमतीने पोलिसांत तक्रार दाखल केली गेली असे समजते. पोलिसांनीही हा प्रकार गंभीरपणे घेऊन तपास सुरू केल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment