पवारांनी फुल पॅन्ट घालून देशाला पूर्ण नग्न केले; ठाकरेंची टीका

नाशिक  – पवार काका-पुतण्याची मस्ती आम्ही उतरवणार आहोत,  शरद पवारांनी फुल पॅन्ट घालून देशाला पूर्ण नग्न केले अशी घणाघाती टीका शिवसेनेचे  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली . नाशिकमध्ये झालेल्या सभेत ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तोंडसुख घेताना त्यांच्यावर पवारांचे  भ्रष्टाचारातील वारस असे ‘लेबल’ही  चिटकवले. ठाकरे म्हणाले  शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना फसवण्याचे कटकारस्थान भुजबळांनी केले . 

भुजबळांच्या या कारस्थानाबाबत  पवारांना माहित नव्हते का? असा सवालही  त्यांनी केला . भुजबळांच्या  या कारस्थानामुळे महाराष्ट्र पेटला असता असे असूनही पवारांनी दुर्लक्ष केले असेही ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांचे चरित्र चांगले असून राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार भ्रष्ट  आहेत असे स्पष्ट करताना पवार दिसेल ते खात सुटले आहेत. गायरानाची जमीनही यातून सुटली नाही  . पवारांनी फुल पॅन्ट घालून देशाला पूर्ण नग्न केले.   पवारांनी आजपर्य़ंत अनेक कोलांटउड्या मारल्या असेही ते म्हणाले.