सोलापूर जिल्ह्यात वीज पडून तीन ठार

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या काही भागाला दोन दिवस सलग वादळी वारे आणि अवकाळी पाऊस यांचा फटका बसून तिघांचा मृत्यू झाला. वीज पडून मोहोळ तालुक्यातील दोन महिला मजूर जागीच ठार झाल्या, तर अक्कलकोट तालुक्यात घराच्या पत्र्यावरील दगड अंगावर पडून एक महिला मरण पावली. 

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी वीज अंगावर पडल्याने लांबोटी येथे दोघींचा मृत्यू झाला. या घटनेची मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नागणसूर (ता. अक्कलकोट) परिसरात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शेतातील शेडवरील पत्रे उडाले. त्यावरील दगड डोक्यावर पडून श्रीदेवी चन्नप्पा पाटील (वय ४२) ही महिला ठार झाली. 

दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सांगोला, मोहोळसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित आहे. सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला या तीन तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचा मोठा तडाखा बसलेला आहे.