फेसबुकला मागे टाकून गूगलचा टायटन ड्रोनवर कब्जा

फेसबुकला सर्च इंजिन जायंट गूगलने धोबीपछाड देत टायटन एअरोस्पेस ही ड्रोन बनविणारी कंपनी विकत घेतली. गूगलने त्यासाठी किती पैसे मोजले, हे मात्र अजून जाहीर झालेले  नाही.टायटन एअरोस्पेस ही कंपनी ड्रोन निर्मिती करते. ड्रोन म्हणजे वैमानिक विरहित अतिशय लहान आकाराची विमाने. यापूर्वी अमेझॉन या शॉपिंग वेबसाईटने अशाच ड्रोनच्या सहाय्याने ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तूंची डिलेव्हरी करण्याचा प्रकल्प सुरू केला होता. त्याशिवाय अमेरिकी सैन्य अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानातील दुर्गम भागातील तालिबानी अतिरेक्यांना टिपण्यासाठी अशा ड्रोन विमानाचा वापर करते.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये या व्यवहाराची माहिती सर्वप्रथम प्रकाशित झाली, त्यानंतर गूगलकडून पहिल्यांदाच टेकरडारला ही माहिती देण्यात आली.टायटन एअरोस्पेसच्या या ड्रोनचा वापर गूगल अर्थातच वस्तूंच्या डिलीव्हरीसाठी करणार नाही तर जगभरात जिथे इंटरनेटची सुविधा नाही, किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे तिथे इंटरनेट पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ड्रोनचा वापर होणार आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट पोहोचवण्याचा गूगलचा हा प्रकल्प प्रोजेक्ट लून म्हणून ओळखला जातो. यामध्ये महाकाय एअरबलूनच्या सहाय्याने इंटरनेट सुविधा पोहोचवण्याचा गूगलच्या शास्त्रज्ञांनाचा मानस आहे. आता या प्रकल्पाला ड्रोनची जोड मिळाल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेटने संपर्क शक्य होणार आहे.

ड्रोन निर्मिती करणारी ही कंपनी विकत घेण्यासाठी सोशल नेटवर्किंगमधील महाकाय कंपनी फेसबुकही प्रयत्नशील होती. मात्र गूगलने फेसबुकच्या आधी हा व्यवहार पूर्ण केला.जगभरात इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासोबतच आपात्कालीन मदत आणि कार्य किंवा हवामान अभ्यास यासाठीही टायटन एअरोस्पेसच्या ड्रोनचा वापर होणार असल्याचं गूगलच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.त्यासोबतच या ड्रोनच्या सहाय्याने पृथ्वीचे वेगवेगळ्या कोनातून आणि अंतरातून हायरेज फोटो घेऊन त्याचा वापर गूगलच्या गूगल मॅप सेवेसाठी करता येणार आहे.टायटनच्या या सौरउर्जेवर चालणाऱ्या ड्रोनमुळे गूगलला 1 जीबी प्रति सेकंद या वेगाने इंटरनेट सुविधाही पुरवता येणार आहे.

Leave a Comment