आयपीएलला होणार धुमधडाक्यात सुरूवात

अबुधाबी- भारतात आागमी काळात लोकसभेच्या निवडणूका होत असल्याने अबुधाबीत आयपीएल स्पर्धा होत आहे. बुधवारपासून आयपीएलच्याल सातव्या हंगामाला सुरुवात होत आहे. गेल्या सात वर्षाच्या कालावधीत निवडणूकामुळे दुस-यांदा आयपीएल स्पार्धा परदेशात होत आहे. आयपीएल स्पार्धेचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) होत आहे.

आयपीएल स्पर्धेच्या सलामीला गतविजेता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी अजिंक्यपदाचा मान पटकावला. त्यानंतर विक्रमवीर सचिन तेंडुलकरने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. सचिनच्या निवृत्तीने धक्का बसला तरी त्याला विजयी निरोप देण्यात आल्याने मुंबईचे क्रिकेटपटू सुखावले आहेत. गतविजेत्यांकडे यंदाही जेतेपदाचा दावेदार म्हणून मानले जात आहे.

सलामीला खेळल्या जात असलेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे पारडे जड आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा फलंदाजीचा कणा आहे. गत मोसमात त्याने बहारदार फलंदाजीसह कुशल नेतृत्व भूषवताना पहिल्यावहिल्या जेतेपदात मोलाचा वाटा उचलला. रोहितसह ऑफस्पिनर हरभजन सिंग, वेगवान गोलंदाज लसित मलिंगा, फटकेबाज कीरान पोलार्डला मुंबईने कायम ठेवले. सातव्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर माइक हसी, न्यूझीलंडचा अष्टपैलू कोरी अँडरसन, आदित्य तरे, सी. गौतममुळे फलंदाजी मजबूत झाली आहे. अनुभवी झहीर खानसह र्मचट डी लँगे, जोश हॅझ्लेवुड, जसप्रीत बुमरा, किश्मर सँटोकीमुळे मध्यमगती मा-यात तसेच डावखुरा प्रग्यान ओझा, जलाज सक्सेनामुळे फिरकी मा-यात अधिक विविधता आहे.

कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर आणि अष्टपैलू जॅक कॅलिस वगळता माजी विजेता (२०१२) कोलकाता संघात ‘स्टार’ क्रिकेटपटूंची उणीव भासते. या दुकलीवर फलंदाजीची भिस्त असली तरी दोघेही फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. गंभीर, कॅलिससह युसुफ पठाण, रॉबिन उथप्पा, मनिष पांडेवर कोलकात्याची फलंदाजीची मदार आहे. फलंदाजीच्या तुलनेत रायडर्सकडे चांगले गोलंदाज आहे. वेगवान मॉर्नी मॉर्केल आणि आंद्रे रसेल, ऑफब्रेक सुनील नारायण, डावखुरा लेगब्रेक पियुष चावलाकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्यात विजय कोण मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment