हे कसले अर्थशास्त्र?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण भाषण करण्याच्या आविर्भावात केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचे संकलन आणि त्यांचे होणारे वितरण यावर आपली मते मांडली. शेवटी त्यांना प्रादेशिक भावनाच भडकावयाची आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा सूर आळवून आपले खासदार लोकसभेत महाराष्ट्राला न्याय मिळवून देतील असे भासवायला सुरूवात केली आहे. मात्र हे करताना आपण चुकीचे आकडे वापरून लोकांची दिशाभूल करत आहोत याची त्यांना जाणीव नाही. त्यांनी  जे आकडे जाहीर केले आहेत त्यांच्याशी कोणताही अर्थशास्त्री सहमत होणार नाही. इतके त्यात मनाला येईल तसे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. त्यांची ही सभा काल पुण्यात झाली. अलीकडे त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत नाही. कारण २००५ साली हा पक्ष स्थापन झाला तेव्हा त्या पक्षाविषयी लोकांच्या मनात जे आकर्षण होते ते आता राहिलेले नाही. कारण राज ठाकरे यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही हे लोकांच्या लक्षात आलेले आहे. काल त्यांनी पुण्याच्या सभेत बरीच आकडेवारी जाहीर केली आणि केंद्र सरकार महाराष्ट्रावर कसे अन्याय करत असते हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी महाराष्ट्रात आयकर खूप जमा होतो पण त्यातला फार लहान हिस्सा महाराष्ट्राच्या विकासाला मिळतो असे सांगितले. 

केंद्र सरकार पूर्ण देशातून आयकर आणि केंद्रीय अबकारी कर असे दोन कर जमा करते. त्याशिवाय राज्य सरकार व्हॅट आणि व्यवसाय कर असे मुख्यत्वे दोन मोठे कर आपल्या राज्यात वसूल करत असते. केंद्र सरकार विविध राज्यांमध्ये आयकर वसूल करून तो दिल्लीला पाठवते आणि त्या करातून राज्यांच्या विकासासाठी त्या त्या राज्याच्या गरजेनुसार निधी पाठवला जातो. राज ठाकरे मात्र आपल्या भाषणामध्ये आपण व्यवसाय कर केंद्राला पाठवतो असे सांगत होते. वास्तविक व्यवसाय कर हा राज्य सरकारचा कर आहे आणि तो राज्यातच रहात असतो. त्यातून राज्य सरकार आपल्या विकासाच्या योजना राबवत असते. तेव्हा आपण केंद्राला व्यवसाय कर पाठवतो ही राज ठाकरे यांची माहिती पूर्णपणे चुकीची होती. विकसित राज्यातून केंद्र सरकारला आयकर भरपूर मिळतो, ते केंद्र सरकारचे उत्पन्न असते. त्यामुळे ज्या राज्यातून तो जमा होतो त्या राज्याला तो तेवढाच परत केला पाहिजे असे नाही. विकसित भागातून कर जमा करून अविकसित भागात जास्त प्रमाणावर खर्च करून विकासाचा समतोल साधणे हाच केंद्राच्या योजनेचा हेतू असतो. तेव्हा आपण जेवढा आयकर जमा करतो तेवढा आपल्याला मिळाला पाहिजे असे म्हणणार्‍यांचे अर्थशास्त्र तपासून घेण्याची गरज असते. 

बर्‍याच दिवसांनंतर मनसे नेते राज ठाकरे यांची एक जोरदार सभा पुण्यात झाली. राज ठाकरे काय की अरविंद केजरीवाल काय या दोघांचाही भर दुसर्‍यावर टीका करण्यावरच आहे. त्यामुळे कोणावर तरी टीका करणे ज्यांना आवडते अशा मतदारांची मते केजरीवाल आणि राज ठाकरे यांच्यात विभागली जाणार आहेत. केजरीवाल यांचा मुळातच महाराष्ट्रात प्रभाव नाही, पण मेधा पाटकर, सुभाष वारे, विजय पांढरे असे चांगल्या चारित्र्याचे काही नेते या पक्षाने उभे केले असल्यामुळे काही प्रमाणात त्यांना मते मिळणार आहेत. परंतु अन्यत्र सारा आनंदी आनंदच राहणार आहे. यातूनही आम आदमी पार्टीला जी मते मिळतील ती मनसेच्या मतातली असणार आहेत. एकंदरीत राज ठाकरे यांचा जो मर्यादित प्रभाव आहे त्यात आम आदमी पार्टी भागीदार झालेली आहे. राज ठाकरे यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्रात आपची काही गरज नाही, मीच सगळ्यांचा बाप आहे अशा वल्गना राज ठाकरे यांनी कितीही केल्या तरी आम आदमी पार्टी त्यांची मते खाणार आहे आणि त्याचा परिणाम राज ठाकरे यांच्यावर होणार आहे. 

शिवाय राज ठाकरे किंवा नारायण राणे असे तोंडाळ नेते अविचाराने बोलून एकाच वेळी अनेक शत्रू निर्माण करून ठेवत असतात. राज ठाकरे यांनी भाजपा-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी या सर्वांनाच डंख मारलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या डावपेचामध्ये जी राजकीय मदत आवश्यक असते ती राज ठाकरे यांना मिळत नाही. त्यामुळे आता आपला पक्ष अजून कायम स्पर्धेत आहे असे दाखविण्यासाठी कुठे तरी जाऊन, गर्दी जमा करून भाषणे करण्यापलीकडे राज ठाकरे यांच्या हातात काही राहिलेले नाही. ही भाषणे खरी असती तर त्यांचीही दखल घेतली गेली असती, परंतु राज ठाकरे जेवढे डावपेचात कच्चे आहेत त्यापेक्षाही जास्त प्रमाणात अभ्यासात कच्चे आहेत. त्यामुळे त्यांची भाषणे ऐकल्यानंतर लोकांचे प्रबोधन होण्याऐवजी त्यांच्या अज्ञानामुळे करमणूक होण्याचीच शक्यता जास्त असते. चार शाब्दीक कोट्या करणे, कोणाची तरी नक्कल करणे किंवा विनोद करणे, कोणाला तरी बोचकारणे याच्या पलीकडे त्यांच्या भाषणाची मजल जात नाही. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास आणि विभिन्न राजकीय विचार यांचा व्यासंग त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांच्या शिवराळ, उठवळ भाषणाचे नाविन्य संपत चाललेले आहे. त्यांनी काल पुण्यात केलेल्या भाषणामध्ये आपल्या अर्थशास्त्रातले अगम्य ज्ञान असेच पाजळले.

Leave a Comment