छत्रपतींचा चुकीचा इतिहास ;उद्धव -राजची भूमिका काय ?

मुंबई  – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत गुजरातमध्ये चुकीचे धडे शिकविले जात असल्याची वस्तुस्थिती उघडकीस आल्याने राज्यात महायुतीत सहभागी असलेली शिवसेना आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठींबा देणारे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  तर राजकीय वर्तुळात सेना – मनसे  या प्रादेशिक पक्षांची पर्यायाने त्यांच्या प्रमुख नेत्यांची कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे. 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणात इतिहासाचे अनेक संदर्भ चुकीचे असल्याचे  वेळोवेळी दिसून येते  आणि त्यावर उठलेली  टीकेची झोडही नवीन नाही. मात्र मोदींच्या तोकड्या ज्ञानामागे गुजरातमधील इतिहासाची पुस्तके  तर नाही ना हा प्रश्न निवडणुकीतच महत्वाचा बनला आहे.गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या सातवीच्या सोशल सायन्स या विषयाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म 1603 मध्ये शिवनेरी राजवाड्यात झाला. तर दादोजी कोंडदेव हे महाराजांचे आजोबा आहेत अशी घोडचूक छापण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनेही या पुस्तकाला मान्यता दिली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे काय पडसाद उमटतात हा मुद्दा महत्वाचा बनला आहे,विशेषतः शिवसेना पर्यायाने उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे,मात्र या प्रकाराचा आणि या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेचा फायदा राज्यात सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीला होण्याची दाट  शक्यता आहे. तसेच  मोदींचे गुणगान गाणाऱ्या या दोन  नेत्यांची पंचाईत होणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.त्यात ते मौनव्रत धारण करतील असेही बोलले जात आहे.  

Leave a Comment