मुंबई – कॉंग्रेसच्या नेत्यांनी नरेन्द्र मोदी यांच्या वैवाहिक जीवनाच्या उचापती करण्याआधी आपले उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे लग्न करून दाखवावे असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातल्या अग्रलेखात शिवसेनेने हा सल्ला दिला आहे. या संबंधात कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांना सातत्याने लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यावरून हा टोमणा सामनाने मारला आहे.
उमेदवारी अर्जातल्या वैवाहिक जीवनाविषयीच्या रकान्यात मोदी यांनी आजवर काहीही माहिती भरली नव्हती पण आता त्यांनी ती भरली आहे यावरून मोदी यांना कायद्याच्या कचाट्यात पकडता येईल असा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे पण त्यात त्यांना यश येणार नाही. ते तसे समजत असतील तर ते मूर्खांच्या नंदनवनात रहात आहेत असे म्हणावे लागेल असे सामनाच्या या अग्रलेखात म्हटले आहे.
कॉंग्रेसने सातत्याने मोदी यांना लक्ष्य केल्याने देशातली महागाई कमी होणार आहे का परदेशात गेलेला काळा पैसा परत येणार आहे असा सवालही या अग्रलेखात करण्यात आला आहे.