मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे. सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे आमदर दीपक केसरकार यांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. या घटनेचे पडसाद लगेचच नाशिक लोकसभा मतदार संघात उमटले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांनी आघाडीचा प्रचार करायचा की नाही यासाठी मंगळवारी बैठक बोलावली आहे.
नाशीक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर येथील आमदार व नारायण राणे यांचे कट्टर समर्थक माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुणाला समर्थन द्यायचा निर्णय घेणार असल्याच जाहीर केले. याठिकाणी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे उमेदवार आहेत. कोकाटेंच्याा या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळत नसल्याचे काही ठिकाणी लक्षात आले आहे. नाशिक जिल्ह़यात भुजबळ आमचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कोकाटे यांनी या आधीही केला होता. मात्र आता सिंधुदुर्गच्या वादाची किनार लाभल्याने भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे हे मंगळवारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.