पुणे – गुजरातच्या तथाकथित विकासाचा बुरखा फाटू लागल्यामुळे व नरेंद्र मोदींचा ढोंगीपणा समोर येेेऊ लागल्यामुळे, मोदी ही निवडणूक गुजरातची नव्हे तर देशाची आहे असे सांगून पलटी मारत आहेत असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड, आमदार मोहन जोशी, शहर प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.
डॉ. महाजन म्हणाले, लोकसभेची निवडणूक असताना केवळ भावनात्मक मुद्यांवरच चर्चा सुरु आहे. ती मुख्य मुद्यांवर आणण्याची आवश्यकता आहे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी देशभर फिरत आहेत. त्यांचे भाषण बघितले तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली जो तथाकथित विकास झाला हाच विकास देशामध्ये करण्यासाठी त्यांना पंतप्रधान करा असे आवाहन ते करीत होते. मात्र, जसजसा त्यांच्या तथाकथित विकासाचा बुरखा फाटू लागला तसे ते पलटी मारत आहेत.
गुजरातच्या सर्वांगीण विकासाचे दिशाभूल करणारे चित्र मोदी व भाजपा कितीही भडक रंगाने रंगवीत असले तरी वास्तव चित्र खूप वेगळे आहे असे सांगून महाजन म्हणाले, 1980 ते 1990 च्या दशकात गुजरातचा सरासरी आर्थिक वृद्धीचा दर 15 टक्के होता. 1990 ते 2000 या काळात तो 9.82 इतका खाली आला. राष्ट्रीय दरापेक्षा तो केवळ 1 टक्क्याने अधिक होता.
गुजरातवर 2001 साली 26 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. ते 2013-14 मध्ये 1,68,000 कोटी रुपये झाले आहे. यु. एन.डी.पी. च्या आह्वालानुसार गुजरातमधील 41.5 टक्के लोक दारिद्र्यात राहत आहेत. महालेखापालाच्या अहवालानुसार 2001-2013 या काळात गुजरात सरकारच्या विविध विभागांमध्ये दीड लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप महाजन यांनी केला.