प्रतिजैविकांचा अतिरेकी वापर

ऍन्टीबायोटिक औषधे हे मानवतेला मिळालेले वरदान आहे, असे मानले जाते. परंतु त्यांचा वापर मर्यादित स्वरुपात केला तरच ते वरदान आहे. त्यांचा अतिरेकी वापर हा नेहमीच घातक ठरत असतो. कारण ही औषधे वारंवार वापरली की, आपल्या शरीरातले काही रोगजंतू त्यांना जुमानेनासे होतात आणि या ऍन्टीबायोटिकचे परिणाम निष्प्रभ करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होते. असे झाल्यास ही ऍन्टीबायो-टिक औषधे निरुपयोगी ठरायला लागतात. त्यांचा गुण येत नाही. 

भारतातल्या या औषधांच्या वापरा-मध्ये गेल्या पाच वर्षात सहापट वाढ झालेली आहे. त्यामुळे भारतामध्ये या औषधांच्या बाबतीत हा धोका निर्माण झाला आहे. काही ऍन्टीबायोटिक औषधे ही निर्वाणीचा उपाय म्हणून वापरायची असतात. ती लहान-मोठ्या इन्ङ्गेक्शनसाठी वापरायची नसतात. परंतु झटपट गुण येण्यासाठी म्हणून काही डॉक्टर अशा प्रतिजैविकांचा सातत्याने वापर करायला लागले आहेत. कार्बापिनीम या प्रतिजैवकाच्या बाबतीत असेच झालेले आहे. सेंटर ङ्गॉर डिसीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स ऍन्ड पॉलिसीज् या अमेरिकेतील कंपनीने भारतात या प्रतिजैविकांच्या वापरात ही वाढ झाल्याची नोंद घेतली आहे. 

२००५ साली भारतामध्ये या औषधांचा वापर दहा लाख रुग्णांमागे ०.२१ एवढाच होता. परंतु २०१० साली तो १.२३ एवढा झाला. भारतातली औषधांची एकूण बाजारपेठ ४६ हजार कोटी रुपये एवढी मोठी आहे. मात्र ऍन्टीबायोटिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या ४६ हजार कोटींपैकी ८ हजार कोटी रुपयांचे मार्केट एकट्या प्रतिजैविकांनी व्यापलेले आहे. त्यातली कार्बापिनीम या एकट्या औषधाचा वाटा १२० कोटी रुपयांचा आहे. पूर्वी या औषधाचा वापर पाकिस्तानमध्ये जास्त होता. परंतु गेल्या पाच वर्षात भारताने पाकिस्तानला याबाबत मागे टाकले आहे. 

या वाढत्या वापराची दखल देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सुद्धा घेतली आहे. हा वापर कमी व्हावा यासाठी काय करता येईल यावर या मंत्रालयाचे अधिकारी विचार करत आहेत. त्यांनी काही प्रतिजैवकांवर सरळसरळ बंदी घालण्याचाच विचार सुरू केला आहे. मात्र भारतासारख्या देशात कोणत्याही गोष्टीवर बंदी घातली की तिचा काळाबाजार सुरू होतो, असा आपला दीर्घकाळचा अनुभव आहे. तेव्हा या प्रतिजैवकांना पर्याय म्हणून दुसरी अशी औषधे देता येतील का, यावर विचार सुरू झाला आहे. या औषधांनी कार्बापिनीमचे काम तर व्हावे पण अतिरेकी वापर झाल्यास त्याचे कसलेही दुष्परिणाम होऊ नयेत. अमेरिकेतल्या आणि भारतातल्याही काही तज्ज्ञांनी मात्र निराशाजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि भविष्यकाळात या औषधांचा वापर वाढतच जाईल हे कटु सत्य आपण स्वीकारले पाहिजे, असे म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment