जगातील सर्वात मोठा सोन्याचा तुकडा सापडला

वॉशिग्टन – सोनेखाणीतून सोने मिळते ते मातीत मिसळलेल्या स्वरूपात हे आपल्याला माहिती असते. या मातीतून नंतर प्रक्रिया करून सोने मिळविले जाते. मात्र अमेरिकी तज्ञांनी जगातील बहुदा सर्वात मोठा सोन्याचा सलग तुकडा तपासला असल्याचे सांगितले जात असून त्याचे वजन आहे २१७.७८ ग्रॅम. व्हेनेझुएला मधून हा तुकडा तपासणीसाठी अमेरिकेतील तज्ञांकडे पाठविला गेला होता. याची किंमत १५ लाख डॉलर्स इतकी ठरविली गेली आहे.

लॉस अलमॉस नॅशनल लॅबोरेटरीतील संशोधक म्हणाले की या तुकड्याचे न्यूट्रोन लेसरच्या सहाय्याने परिक्षण केले गेले. टेनिसच्या चेंडूच्या आकाराचा हा तुकडा सलग आणि नैसर्गिक रित्या बनलेला असल्याचे आढळले. मियामी विश्वविद्यालयातील भूवैज्ञानिकांनी या आकाराचा सलग तुकडा यापूर्वी मिळाल्याचे ऐकीवात नसल्याचे सांगितले. हा तुकडा ज्याच्या मालकीचा आहे त्याने या प्रकारचे चार तुकडे तपासणीसाठी दिले होते त्यातील तीन तुकडे हे मोठे क्रिस्टल असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment