औषधांनी आयुष्य वाढले

सध्या मनुष्यप्राण्याला वृद्धाप-काळावर औषध शोधण्याचे वेड लागले आहे. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी वृद्ध व्हावेच लागते. जीवनातली ती एक अपरिहार्य अवस्था आहे. परंतु ती अधिक सुसह्य व्हावी आणि वृद्धत्व येऊनही जोम कायम रहावा, आयुष्य वाढावे असे प्रत्येकालाच वाटत असते. माणूस जास्तीत जास्त १०० वर्षे जगू शकतो, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. याउपरही शंभरी ओलांडलेले अनेक लोक या जगात आहेत. पण ते अपवादच म्हणावे लागतील. शंभरी-पर्यंत जगता आले तरी ते जगणे आनंदाचे व्हावे, निरामय व्हावे असे प्रत्येकालाच वाटते, म्हणून संशोधक मंडळी त्यादृष्टीने खूप संशोधन करत असतात. स्पेनमधल्या काही शास्त्रज्ञांनी जीन थेरपी या आधुनिक उपचार पद्धतीचा वापर करून माणसाचे आयुष्य वाढू शकते, असे एका संशोधनाअंती दाखवून दिले आहे. स्पॅनिश नॅशनल कॅन्सर रिसर्च सेंटर या संस्थेमध्ये असे प्रयोग सुरू असून त्यातून आशादायक निष्कर्ष निघत असल्याचे म्हटले आहे. जीन थेरपीचा पहिला वापर नेहमीप्रमाणेच उंदरांवर करण्यात आला आहे आणि उंदराच्या आयुष्यामध्ये २४ टक्के वाढ होऊ शकेल, असे या प्रयोगात दिसून आले आहे. 

यापूर्वीही असे प्रयोग करण्यात आले होते. त्या प्रयोगांमध्ये काही प्राण्यांच्या आयुर्मानात वाढ होऊ शकते असे आढळलेही होते. मात्र असा औषधाचा वापर करून माणसाच्या आयुष्यात वाढ करता येणार नाही, असे त्या प्रयोगाच्या अंती निष्पन्न झाले होते. आता मात्र स्पॅनिश शास्त्रज्ञांनी औषधांच्या ऐवजी जीन थेरपीचा वापर केला आहे. या पद्धतीने उपचार केल्यास मात्र माणसाचे आयुष्य वाढू शकते, असे आढळले आहे. आजपर्यंत तरी वृद्धत्वप्रतिबंधक औषधे आणि उपचार यावर संशोधन करताना जीन थेरपीचा कधी वापर केलेला नव्हता. तो पहिल्यांदाच केला गेला आहे. या थेरपीमध्ये शास्त्रज्ञ प्राण्याच्या शरीरातील टेलोमेरेस हे एन्झाईन अधिक कार्यरत करण्याचा प्रयत्न करतात. हे एन्झाईम तयार  करण्यासाठी शरीरातल्या ज्या पेशी मदत करतात त्या पेशींवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या पेशीमधील ज्या जनुकामुळे हे सारे काम होते ते जनुक शोधून त्यावर औषधाचा प्रयोग केला जातो. 

स्पॅनिश शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करताना वयात आलेले उंदीर आणि आयुष्य संपत आलेले उंदीर असे उंदरांचे दोन वर्ग केले होते. तरुण उंदरांच्या आयुष्यामध्ये २४ टक्के वाढ झाली तर आयुष्य संपत आलेल्या उंदरांच्या आयुष्यमानात १३ टक्के वाढ झाली असे दिसून आले. अतीशय वृद्धत्वाकडे झुकलेल्या माणसांना आणि प्राण्यांना सुद्धा कर्करोग होण्याची जास्त भीती असते. म्हणून वृद्धत्वाशी झगडताना कर्करोगावरही उपचार करावे लागते आणि तसे ते करण्यासाठी या स्पॅशिन शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले, तेव्हा त्यांना ही थेरपी सापडली. तिचा प्रयोग सुरू केला असता उंदरांच्या इतरही काही विकारांवर आपोआपच उपचार झाल्याचे आढळले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment