छगन भुजबळ यांच्या विरोधातील नाराजीत वाढ

नाशिक – आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून राज्याजचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ रिंगणात उतरले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्यांपुढील अडचणीत वाढ होत आहे. त्यांच्या विरोधातील मंडळी मोठया प्रमाणात प्रचार यंत्रणेत सहभागी झाल्याने त्यांच्या विरोधातील नाराजी वाढत आहे. त्याचा फटका आगामी काळात भुजबळ यांना बसण्याची शक्यता आहे.

नाशिक मतदारसंघातील वातावरण दिवसागणीक बदलत आहे. आता काँग्रेसचे सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांनी महायुतीच्या उमेदवारांला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भुजबळ यांची चांगलीच अडचण झाली आहे. तसे पाहिले तर गेल्या पाच वर्षांपासून नाशिक जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व असणा-या भुजबळांना आता स्वकीयांकडूनच विरोध होत आहे.

काही दिवसांपूर्वीच नाशिक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दिनकर पाटील यांनी भुजबळांवर टीकेची झोड उठवत त्यांनी बसपाकडून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. महापालिका निवडणुकीतल्या पराभवापासून घुसमटत असणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षांनी समर्थकांचा मेळावा घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या दोघानंतर काँग्रेसचे सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांनी उघडउघड बंडाचे निशाण फडकावले असून भुजबळांच्या विरोधात हेमंत गोडसे यांचा प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात भुजबळ कशाप्रकारे रणनीती आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment