मंगळ यानाचा निम्मा प्रवास यशस्वी

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रोने) मंगळाच्या कक्षेत सोडलेल्या मंगळ यानाने आपला निम्मा प्रवास नियोजित वेळेत आणि नियोजित मार्गाने पूर्ण केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल सकाळी १० वाजता मंगळ यानाचा ३३७.५ दशलक्ष कि.मी. चा प्रवास पूर्ण झाला. या प्रवासात त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायची होती ती पूर्ण झाली आहे.

या मंगळ यानाकडे इस्रोच्या प्रयोगशाळेतून पाठविलेला संदेश त्याच्यापर्यंत पोचला आणि तो संदेश मिळाल्याची पोच सुद्धा मिळाली. या प्रक्रियेला ४ मिनिटे आणि १५ सेकंद लागले. मंगळ ते पृथ्वी हे अंतर सातत्याने बदलणारे आहे. काल हे अंतर सर्वात कमी झाले त्यावेळी हा अर्धा प्रवास पूर्ण झाला. 

आता या यानाने पूर्ण करावयाचा पुढचा प्रवास सुखरूपपणे पार पडेल याची खात्री वाटत आहे. मंगळाच्या कक्षेत मिथेन वायू आहे काय, याचा शोध घेणे हे या यानावर सोपवलेले काम आहे. आजवर जगातल्या विविध देशांनी मंगळाच्या संशोधनासाठी ५१ अंतरिक्ष याने पाठवली. त्यातल्या २१ अंतरिक्ष यानाच्या मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. त्यात आता भारताच्या मोहिमेची भर पडेल.