डोकेदुखीवर डाएट थेरपी

सध्याच्या जीवन पद्धतीने स्पर्धा ङ्गार वाढवलेली आहे आणि स्पर्धेपोटी लोक जीवापलीकडे काम करायला लागले आहेत. त्यामुळे दगदग, धावपळ आणि टेन्शन हे आपले सहकारी झालेले आहेत. त्यातून डोकेदुखी हा एक कायमचा विकार होऊन बसलेला आहे. शरीराचा दुसरा कसलाही विकार नाही, परंतु केवळ डोकेदुखी आणि ती सुद्धा तीव्र डोकेदुखी असे अनेक रुग्ण डॉक्टरांकडे यायला लागले आहेत. त्यातल्या ९० टक्के रुग्णांचे डोकेदुखीचे कारण टेन्शन हेच आहे. डॉक्टर सुद्धा अशा रुग्णांना वेदनाशामके देऊन स्वत:चे आणि रुग्णाचे समाधान करतात. गोळीचा परिणाम असेपर्यंत डोकेदुखी थांबते आणि काही वेळाने पुन्हा सुरू होते. पुन्हा गोळी घेतली जाते. अशा पद्धतीने डोकेदुखी आणि गोळी हा नित्यक्रम होऊन बसतो. डोकेदुखीच्या मूळ कारणाकडे वळून ते कारण नष्ट करणे यावर कोणी भर देत नाही. या डोकेदुखीतून कायमचे मुक्त होण्या साठी तणाव कमी केला पाहिजे. 

त्यासाठी ध्यानधारणा, शारीरिक हालचाली वाढवणे, थोडेसे जॉगिंग, लैंगिक संबंध यांचा उपयोग होतो आणि त्यातून काही प्रमाणात मूळ कारणावर इलाज होतो. मात्र अशा डोकेदुखीवर आता डॉक्टरांनी आहारावर नियंत्रण ठेवण्याचा उपाय शोधून काढला आहे. लठ्ठपणा वाढत चाललेल्या लोकांना आहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात असतो. परंतु डोकेदुखीच्या रुग्णांना दिला जाणारा असा सल्ला थोड्या वेगळ्या प्रकारचा असतो. त्यामध्ये आहारावर नियंत्रण करताना काही विशिष्ट प्रकारचा आहार घेण्याचा सल्ला दिला जात असतो. उदा. तीव्र डोकेदुखीवर मॅग्नेशियमयुक्त किंवा रायबोफ्लेवीनयुक्त आहार उपयुक्त असतो किंवा चरबीचे प्रमाण कमी असलेल्या दुग्धजन्य पदार्थांनी सुद्धा डोकेदुखी कमी होत असते. अंडी, हिरव्या पालेभाज्या यांनी सुद्धा तणावातून निर्माण झालेली डोकेदुखी कमी होऊ शकते. 

हिरव्या पालेभाज्यां मध्ये आणि द्विदल धान्यांमध्ये त्याच बरोबर शेंगदाणे, काजू, बटाटे यामध्ये असलेली विशिष्ट द्रव्ये डोकेदुखीवर उपयुक्त ठरतात. डोकेदुखी असणार्‍या अशा लोकांनी आपल्या खाण्यातून पिण्यातून आवश्यक तेवढे ड जीवनसत्व आपल्या पोटात जात आहे का, याची दक्षता घेतली पाहिजे. ते कमी पडल्यास सुद्धा डोकेदुखी वाढू शकते. मात्र ही डोकेदुखी वाढविणारे सुद्धा काही अन्नघटक आहेत. त्यामुळे डोकेदुखी वाढवणारे अन्नपदार्थ आपल्या जेवणातून पोटात जाणार नाहीत याचीही दक्षता घेतली पाहिजे. याबाबतीत मात्र रुग्णांना आपल्या खाण्याचे ट्रॅकिंग करावे लागते. आपण दिवसभरात काय खातो, याची नोंद ठेवावी लागते आणि एखाद्या विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर हमखास डोकेदुखी वाढते का, यावर लक्ष ठेवावा लागते. जे पदार्थ खाल्ल्यास डोके दुखायला लागते ते पदार्थ स्वत:हून वर्ज्य करावे लागतात. यासाठी स्वत:च्या नोंदी अधिक आवश्यक आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment