अमेरिकेत पाळीव प्राणी वस्तूंचा व्यवसाय तेजीत

अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठी पुरविल्या जाणार्‍या विविध सेवा आणि वस्तूंचा व्यवसाय खूपच तेजीत असून गतवर्षात अमेरिकन लोकांनी आपल्या आवडत्या पेटसाठी तब्बल ३३४६ अब्ज रूपये खर्च केले असल्याचे आकडेवारी सांगते. हा खर्च लक्झबर्गच्या जीडीपी पेक्षाही खूपच र्अधिक आहे.

पेट प्रॉडक्ट असोसिएशनचे सीइओ बॉब वेटेर यांच्या म्हणण्यानुसार सरकार पेट इंडस्ट्रीचे वेगळे अस्तित्त्व मान्य करत असेल तर या उद्योगाचा क्रमांक रिटेल सेक्टरमध्ये ७ वा आहे. अनेक इंटरनेट रिटेल कंपन्याही या उद्योगावर लक्ष ठेवून आहेत आणि या कंपन्यांतून गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.

उदाहरण द्यायचे तर व्हिसल कंपनीने नाण्याच्या आकाराचे प्राण्याच्या गळ्यात बांधण्याचे उपकरण बाजारात आणले असून त्याची किंमत आहे ७७५० रूपये. हे उपकरण प्राण्याच्या हालचालीवर नजर ठेवते. दोन वर्षात या कंपनीने ३८ कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे. स्विफ्टो कंपनीने एक अॅप बाजारात आणले आहे. त्याच्या सहाय्याने कुत्री फिरविण्यासाठी वॉकरची सेवा मिळते. याला जीपीएस सिस्टीम आहे व त्यामुळे मालकाला आपले लाडके कुत्रे कुठे आहे ते समजते. कुत्र्याला ३० मिनिटे फिरविण्यासाठी २१०० रूपये आकारले जातात. डॉगवेके ही साईट तुम्ही सुट्टीवर जाणार असाल तर तुमची कुत्री, मांजरे, ससे यांची देखभाल करते. या कंपनीनेही मार्च २०१२ मध्ये स्थापना झाल्यापासून १३२ कोटींचा व्यवसाय केला आहे.

मनोरंजन क्षेत्रातील बारबॉक्स कंपनी ११०० रूपये प्रतिमहिना आकारून पाळीव प्राण्यांसाठी खेळणी, गॅजेट, खाणेपिणे साहित्य पुरविते. या कंपनीचे १ लाख ८० हजार ग्राहक आहेत. शिवाय पाळीव प्राण्यांसाठी कपडे, पार्लर, खाण्याचे पदार्थ इत्यादी पुरविणार्‍या कंपन्यांही चांगला व्यवसाय करत आहेत.

Leave a Comment