राजकारणामध्ये साम-दाम-दंड-भेद असे सारे मार्ग अवलंबावे लागतात. निवडणुका जिंकायच्या असतील तर आपला पक्ष भक्कम करावा लागतो. पण त्याचबरोबर जमल्यास विरोधी पक्षात भांडणे लावावी लागतात. त्यांच्यात काही मतभेद असतील तर त्यांचा फायदा उठवावा लागतो. शेवटी हे राजकारण आहे. परंतु त्याबरोबर स्वत:चीही काही ताकद असावी लागते. निव्वळ दुसर्याच्या भांडणावर अवलंबून राहून आपल्याला यश मिळेल असे समजण्यात काही अर्थ नसतो. थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे तर प्रतिस्पर्ध्यांची भांडणे हा एक मार्ग असून शकतो, पण आपल्या पक्षाचे सारे भवितव्य या एकाच गोष्टीवर अवलंबून ठेवणे हे कमीपणाचे लक्षण आहे. सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्ताधारी आघाडीची अवस्था नेमकी अशीच झाली आहे. त्यांच्या विजयाचा सारा भार त्यांनी केलेल्या कामावर नसून भाजपा-सेना आणि मनसे यांच्यातल्या भांडणावर पडलेला आहे. किंबहुना तो एवढा पडलेला आहे की, हे पक्ष न भांडतील तर आपल्याला निवडणुकीत यश मिळेल की नाही अशी चिंता खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पडली आहे.
२००९ साली कॉंग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रात हॅटट्रिक केल्याचा दावा केला. परंतु त्यांच्या हॅटट्रिकच्या यशाचे रहस्य त्यांच्या स्वत:च्या कारभारात नसून शिवसेना आणि मनसेच्या भांडणात आहे आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी लाजीरवाणी आहे. कॉंग्रेसचे केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर पूर्ण देशातले यश सुद्धा असे दुसर्याच्या भांडणावर आणि कॉंग्रेसविरोधी मतांच्या फुटीवर अवलंबून आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा कॉंग्रेसविरोध मतातली फूट टळली तेव्हा तेव्हा कॉंग्रेस साफ पराभूत झाली. महाराष्ट्रात कॉंग्रेसविरोधी मते फुटू नयेत म्हणून भाजपा आणि शिवसेनेने युती केली, परंतु मनसेच्या रुपाने पुन्हा ही फूट झाली आणि ती फूट कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली. म्हणजे कॉंग्रेस आपल्या स्वत:च्या हिमतीवर सत्तेवर येणार नाही तर विरोधकांच्या भांडणाच्या जोरावर सत्तेवर येणार आहे. म्हणूनच पृथ्वीराज चव्हाण मनसे, भाजपा आणि शिवसेना यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना ठाकरे बंधूंच्या अहंकारामुळे यशही येत आहे आणि दोघातले भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीमुळे या भांडणाने थोडी विश्रांती घेतली आहे. आपल्या वैयक्तिक भांडणामागचा धोका त्यांनी दोघांनाही समजून सांगितला आहे. त्यामुळे दोघेही शहाणे झाले आहेत.
आता त्यामुळे मुख्यमंत्री अस्वस्थ झाले आहेत. हे लोक भांडले नाहीत तर आपले काय होईल या प्रश्नाने ते बेचैन झाले आहेत. महाराष्ट्रातले पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार यशस्वी लोकसभा निवडणुकीत यशस्वी होणार की नाही हे त्या सरकारच्या कामगिरीवर ठरणार नसून मनसे-शिवसेनेच्या भांडणावर ठरणार आहे. म्हणून पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातले शासन सुधारण्याऐवजी आणि आपले पवारांशी असलेले मतभेद संपवण्याऐवजी ठाकरे बंधूंची भांडणे कशी वाढतील असा प्रयत्न करत आहेत. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला चुचकारायला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील दरी वाढविण्याच्या हेतूने त्यांनी काही विधाने केली आहेत. भाजपाचे नेते शिवसेनेला विश्वासात न घेता मनसेशी गुफ्तगू करतात तेव्हा भाजपाचा अंतस्थ हेतू शिवसेनेने ओळखला पाहिजे आणि भाजपापासून सावध राहिले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांचा हा आगलावेपणा कितपत मनावर घ्यायचा आणि मनावर घेऊन नेमके काय करायचे हे उद्धव ठाकरे यांनी ठरवायचे आहे. परंतु निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुख्यमंत्र्यांना आपले घर सावरण्याच्या ऐवजी दुसर्यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न करावा लागतो ही गोष्ट मुख्यमंत्र्यांसाठी शोभादायक नाही.
मुख्यमंत्री हे सत्तेवर असतात, त्यामुळे त्यांनी लोकांसाठी काय केले हे सांगून सकारात्मक मुद्यांवर मते मागायची असतात. पण मुख्यमंत्री स्वत:च असे सकारात्मकपणे सांगण्यासारखे काही करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना दुसर्यांच्या आघाडीत भांडणे लावण्याचा नकारात्मक प्रचार हाती घ्यावा लागतो. त्यांच्या स्वत:च्या आघाडीत एकवाक्यता नाही. गेल्या पंधरा वर्षातला राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबतचा संसार सतत धुसफुशीनेच सुरू राहिलेला आहे. पंधरा वर्षे एका आघाडीत असून सुद्धा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष कधी एका आवाजात बोललेले नाहीत. निर्णय घेण्यात एकवाक्यता नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या मतांनुसार आणि मनानुसार वागत आणि बोलत आलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्या धिम्या गतीने काम करण्याच्या सवयीची उघडपणे टिंगल करत असतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे धडाकेबाज काम केले पाहिजे असे त्यांचेच मंत्री सांगत असतात. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे हात एकमेकांच्या हातात गुंतलेले असले तरी शरद पवार यांची नजर नेहमीच दुसर्या आघाडीकडे लागलेली असते. त्यांना कधी तिसर्या आघाडीचे वेध लागतात तर कधी मोदीमंत्राची मोहिनी त्यांना पडलेली असते. स्वत: शरद पवार यांनीच पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना, कोणत्याही निर्णयावर सही करताना मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा होत असतो असे उद्गार काढले होते याची आठवण यावेळी होते.