कॅल्शियमच्या वापराबाबत सावध

माणूस वृद्धत्वाकडे झुकायला लागला की, त्याची हाडे नाजूक व्हायला लागतात आणि छोट्या-मोठ्या अपघाताने ङ्गॅक्चर होणे किंवा अस्थिभंग होऊन अंथरुणाला खिळून राहणे असे प्रकार घडायला लागतात. शरीरामध्ये कॅल्शियम कमी असले की हाडे लवकर कमकुवत होतात आणि असे प्रश्‍न निर्माण होतात. म्हणून कॅल्शियमचा पुरवठा शरीराला भरपूर झाला पाहिजे, असे डॉक्टर सांगायला लागतात. वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत शरीराला कॅल्शियम मिळत आहे की नाही याचा कधी विचार केलेला नसतो आणि ५० व्या वर्षानंतर त्याचे परिणाम जाणवायला लागतात. मग लोक जागे होतात आणि टॉनिक, पोषक आहारद्रव्ये यांच्या सोबतच पुरवणी म्हणून कॅल्शियमही दिले जायला लागते. आता ही गोष्ट सर्वांना माहीतच झालेली आहे. ऑस्टीओ पोरोसिस हा विकार वृद्धत्वात टाळण्यासाठी शरीराला कॅल्शियम मिळणे आवश्यक आहे हे लोकांच्या मनावर बिंबले आहे. मात्र आता याबाबतीत सुद्धा तज्ज्ञांमध्ये वेगळा अनुभव यायला लागला आहे आणि त्यांनी या बाबतीत थोडा सावधानतेचा इशारा दिला आहे. 

भरपूर कॅल्शियम म्हणजे मजबूत हाडे, असे काही समीकरण तयार करता येणार नाही. तेव्हा हाडे मजबूत करण्यासाठी कोणी अतिरेकी कॅल्शियम घेत असेल तर त्यांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे. काही वेळा मर्यादेपेक्षा अधिक कॅल्शियमचा पुरवठा शरीराला झाला तर उलट हाडांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संबंधीचे शास्त्र थोडे समजून घेतले पाहिजेत. ऑस्टिओ पोरोसिस हा कॅल्शियमच्या कमतरतेचा विकार नाही. तेव्हा केवळ कॅल्शियम घेतल्याने हाडे मजबूत होतील आणि वृद्धावस्थेमध्ये ऑस्टिओपोरोसिस पासून सुटका होईल असे काही मानता कामा नये. ऑस्टिओपोरोसिस हा ङ्गार गुंतागुंतीचा विकार आहे. त्यामागे व्यायामाचा अभाव, दीर्घकाळचा शरीराचा दाह, जीवनसत्वाचा अभाव, सूक्ष्म द्रव्यांचा अभाव आणि पोषण विषयक असमतोल हीही ऑस्टिओ पोरोसिसची कारणे आहेत. तेव्हा हे लक्षात घेतले म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस टळेल हा गैरसमज असल्याचे समजेल. 

कॅल्शियमने ऑस्टिओपोरोसिस टाळायचाच असेल तर निव्वळ कॅल्शियम घेऊन चालणार नाही तर त्याच्या सोबत जीवनसत्वांचा पुरवठा करणारा आहारही घेतला पाहिजे. त्यातल्या ड जीवनसत्व अधिक महत्वाचे मानले जाते. शरीराला थोडा तरी उन्हाचा त्रास दिला पाहिजे. कारण उन्हातून मुबलकपणे ड जीवनसत्व मिळत असते. तेव्हा ड जीवनसत्वाशिवाय काही प्रथिने सुद्धा शरीराला मिळाली पाहिजेत. महत्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियम शरीराला द्यायचा असेल तर तो कशात विरघळतो याचा विचार करावा लागतो. तो न विरघळणार्‍या गोष्टीतून घेण्याचा प्रयत्न केला तर शरीराला प्राप्त होत नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment