हिटलरने अजाणताच केला ज्यू मुलीशी विवाह?

ज्यू लोकांचा नरसंहार करण्याच्या कृत्यामुळे जगभरात बदनाम झालेला जर्मनीचा चान्सलर अॅडॉल्फ हिटलर याने अजाणताच ज्यू मुलीशी विवाह केल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही माहिती सत्य ठरली तर जगाच्या इतिहासातील ती सर्वात मोठी विडंबनात्मक घटना ठरेल असे जाणकारांचे मत आहे.

दुसर्‍या महायुद्धात पराभव पत्करावा लागल्यानंतर हिटलरने शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून गुप्त बंकरमध्ये आश्रय घेतला होता. मात्र शत्रूच्या हातात पडणार अशी खात्री पटल्यानंतर त्याने त्याची दीर्घकाळची प्रेयसी इव्हा ब्राऊन हिच्यासोबत लग्न केले आणि त्यानंतर दोघांनीही त्वरीत आत्महत्या केली. या दोघांचीही शरीरे नंतर जाळण्यात आली असे इतिहास सांगतो. संशोधकांनी इव्हा ब्राऊनच्या केसांचे डीएनए नमुने तपासले आहेत. त्यात असे आढळले की तिचे पूर्वज ज्यू असले पाहिजेत. ब्रिटीश चॅनल फोर वर डेड फेमस डीएनए या कार्यक्रमात ९ एप्रिलला या संबंधीचा अहवाल सादर केला जाणार आहे.

संशोधकांचे म्हणणे असे आहे की १९ व्या शतकात अनेक ज्यूंनी कॅथॉलिक धर्म स्वीकारला होता. इव्हाचे पूर्वज त्यातीलच एक असावेत. कदाचित इव्हाला स्वतःलाही ही माहिती नसावी. वयाच्या १७ व्या वर्षीच इव्हा हिटलरच्या प्रेमात पडली तेव्हा हिटलर ४० वर्षांचा होता.हिटलरने त्याचा सचिव मार्टिन बोरमन याला इव्हा आर्यवंशीयच आहे ना याची माहिती काढायला सांगितली होती आणि ती ज्यू नाही असे कळल्यानंतरच तिच्याशी संबंध वाढविले होते.

Leave a Comment