साप, पाली, सरड्यांसह घ्या कॉफीपानाचा आनंद

जगात अनेक कॅफे आपल्या वैशिष्ट्यांसह प्रसिद्ध आहेत. पाळीव प्राण्यांसह खानपानाचा आनंद देणारे कॅफेही खूप आहेत. पण व्हीएतनामच्या हनोई शहरातील एक कॅफे मात्र जगावेगळाच म्हणावा लागेल. कारण येथे साप, विंचू, पाली, सरडे यांच्यासह कॉफीपानाचा आनंद पर्यटकांना लुटता येतो.

या कॅफेचा मालक २८ वर्षीय ग्यूएन मिन्ह याला बालपणापासूनच सरपटणार्‍या प्राण्यांचे फार प्रेम आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तो हे प्राणी सांभाळतो आहे. त्यातूनच त्याला या कॅफेची कल्पना सुचली. त्याच्या कॅफेत साप, सरडे, पाली, उंदीर, विषारी कोळी, विंचू अशा अनेक प्राण्यांचे उत्तम कलेक्शन आहे. हे सर्व प्राणी काचेच्या पेट्यांतून ठेवले आहेत. मात्र एखाद्या ग्राहकाला या प्राण्यांचे जादा प्रेम असेल तर तो या प्राण्यांना हाताळूही शकतो आणि त्यांच्यासोबत कॉफीपानाचा आनंद लूटू शकतो. मिन्ह ने थायलंड, सिगापूर, ऑस्ट्रेलिया चीन या देशातून हे प्राणी गोळा केले आहेत.

तो म्हणतो, या प्राण्यांना खाऊ घालणे सोपे आहे पण सांभाळणे अवघड आहे. आपल्या कॅफेत येणार्‍या कोणाही ग्राहकाला या प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून सर्व प्राण्यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे असेही तो सांगतो. मात्र हा कॅफे कायम अंधारात बुडालेला असतो कारण येथल्या प्राण्यांना उजेड अजिबात पसंत नाही. मग या कॅफेला भेट द्यायचा प्राग्रॅम कधी बनवताय?

Leave a Comment