उत्तर प्रदेशात पुन्हा जातीय समीकरणे

उत्तर प्रदेेशात जातीय समीकरणावर निवडणुका होण्याची परंपरा आहे. मात्र या राज्याचे वैशिष्ट्य असे की, प्रत्येक निवडणुकीत वेगळी जातीय समीकरणे साकार होत असतात. कधी मुस्लिम समाज समाजवादी पार्टीच्या मागे उभा रहातो आणि त्यात यादव मते मिसळली गेली की, समाजवादी पार्टी विजयी होते. पण काही वेळा मुस्लिम मते विचलित होतात आणि मुलायमसिंग यादव यांचे गणित चुकून ते वनवासी होतात. त्यांच्या या संकुचित समीकरणाला मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने शह दिला आणि अनेक जातींचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न केला.

बसपाची सारी उभारणी उच्चवर्णियांच्या आणि त्यातल्या त्यात ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरुद्ध झालेली आहे पण मायावती यांना असा साक्षात्कार झाला की, याही जातींना आपण जवळ केले पाहिजे. कारण केवळ दलितांच्या २८ टक्के मतांवर राजकारणाचा सारा खेळ करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी आधी ब्राह्मणांना जवळ केले. राज्यात १४ टक्के ब्राह्मण आहेत. त्यामुळे त्यांनी जेव्हा हा प्रयोग केला तेव्हा त्यांना राज्यातली सत्ता मिळाली.

हेही समीकरण फार दिवस चालले नाही. कारण या समीकरणातले मुस्लिम पुन्हा समाजवादी पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन त्यांच्या सायकलवर सवार व्हायला तयार झाले. असे झाल्याने पुन्हा एकदा समाजवादी पार्टीला राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतियांश बहुमत मिळाले. आता पुन्हा एकदा नव्या समीकरणात मुस्लिम समाजाला महत्त्व आले आहे आणि जाट समाज लक्ष वेधून  घेत आहे.

जाट समाजाला महत्त्व कारण म्हणजे केन्द्रातल्या कॉंग्रेस सरकारने या समाजाला आरक्षण जाहीर केले. असा जिव्हाळ्याचा निर्णय झाल्यामुळे आता जाट समाज आपल्या मागे येणार असे कॉंगे्रेसला वाटायला लागले. कॉंग्रेसने यावेळी ज्या राष्ट्रीय लोक दलाचा या समाजावर प्रभाव आहे. तो राज्याच्या पश्‍चिम भागात प्रामुख्याने आहे. तो प्रभाव, आरक्षण आणि रालोदशी युती यामुळे जाट समाज आपल्या बाजूला आला की राज्यातल्या बर्‍याच जागा आपल्याला मिळणार असा कॉंग्रेसचा अंदाज होता. 

या अंदाजाला मुजफ्फरनगर दंगलींनी धक्का दिला. कारण ही दंगल हिंदू मुस्लिम अशी नसून जाट आणि मुस्लिम यांच्यातली आहे. या दंगलीने जाट समाजातला एक वर्ग भाजपाकडे वळला आहे. पण त्याची प्रतिक्रिया होऊन मुस्लिम समाज काही कोणा एका पक्षाकडे कललेला नाही.  या समाजाचे काही मतदार बसपाच्या मागे आहेत तर काही  मतदार समाजवादी पार्टीकडे झुकले आहेत. मात्र कॉंग्रेसने दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांचा आशिर्वाद घेऊन मुस्लिम मते आकृष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. तेव्हा ंदंगलीने हिंदू आणि जाट समाज भाजपाकडे वळला आहे आणि मुस्लिम समाज अनेक पक्षांकडे गेला आहे. 

मुस्लिम कॉंग्रेसकडे वळायला काय पण ढुंकूनही पहायला तयार नाही कारण कॉंग्रेसने जाट समाजाला जसे आरक्षण दिले तसे ते मुस्लिमांना का दिले नाही असा या समाजाचा सवाल आहे. गेल्या १५ वर्षांपासून कॉंग्रेस पक्ष या बाबत केवळ आश्‍वासने देत आला आहे. परिणामी कॉंग्रेसने कितीही प्रयत्न केला तरी मुस्लिम समाजाचा पाठींबा मिळणे आणि उत्तर प्रदेशात जास्त जागा मिळवणे हे कॉंग्रेसचे स्वप्नच राहणार आहे. कॉंग्रेसला कसल्याच आशा नाहीत म्हणजे कॉंग्रेसच्या मागे जाण्यात काही अर्थ नाही असा आजवर या पक्षाच्या मागे राहणार्‍या समाज गटांचा समज झाला आहे त्यामुळे ब्राह्मण, राजपूत आणि जाटव हे समाज घटक कॉंग्रेसपासून दूर गेले आहेत.

भाजपाच्या मागे आज ब्राह्मण, अन्य उच्चवर्णीय उभे आहेत आणि नरेन्द्र मोदी हे ओबीसी वर्गातले असल्यामुळे राज्यातला ओबीसी वर्ग त्यांना पंतप्रधान करायचेच या निर्धाराने त्यांच्या मागे उभा राहिला आहे. एवढे मोठे समाज घटक मागे उभे राहिल्याने भाजपाला यावर्षी राज्यातल्या जागा मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. नवलाची बाब म्हणजे  आजवर भाजपापासून दूर राहणार्‍या मुस्लिम समाजाचा ११ टक्के मतदार वर्ग भाजपाच्या मागे उभा आहे. त्याचाही लाभ भाजपाला होणार आहे.