या देवाला लागतो चॉकलेटचा नैवेद्य

गॉडस ओन कंट्री असे बिरूद मिरविणार्‍या केरळ राज्यात अनेक सुंदर भव्य मंदिरे आहेत. पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या या राज्यात जागोजाग भव्य मंदिरे दिसतात. सर्वसाधारणपणे आपल्याकडे मंदिरात जाताना देवासाठी फुले,फळे, मिठाया, धूपदीप असे नेण्याची आणि देवाला नैवेद्य झाल्यानंतर तोच प्रसाद म्हणून खाण्याची प्रथा आहे. मात्र अलपुझा या लोकप्रिय पर्यटनस्थळी असलेल्या थेकन पलानी बालसुब्रह्मण्यम मंदिराची कथा थोडी वेगळी आहे.

येथील देव प्रभू मुरूगन, कार्तिकेय या नावांनी ओळखला जातो आणि तो शिवपुत्र मानला जातो. मात्र या देवाला चॉकलेटचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. म्हणजे येथे प्रसाद म्हणून चॉकलेटच दिले जाते. परदेशी पर्यटकही येथे येताना डबे भरभरून चॉकलेटस आणतात. मंच मुरूगन म्हणून हा देव प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे, संप्रदायाचे भाविक या देवळात गर्दी करताना दिसतात.

मंदिराचे प्रमुख डी. राधाकृष्णन सांगतात, चॉकलेटचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा कधीपासून पडली हे सांगता येणार नाही. मात्र पूर्वी परिक्षा काळात विद्यार्थी येथे मोठ्या संख्येने येत तेव्हा चॉकलेटचा नैवेद्य दाखवित असत. आता मात्र सर्व भाविक चॉकलेटच नैवेद्य म्हणून आणतात.

सुंदर समुद्र किनारे, मसाल्याची शेती, हिरवा गार निसर्ग, निरामय शांततेसाठी केरळ पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. आपणही जाल तेव्हा या सार्यार गोष्टींचा मनमुराद उपभोग घ्याच पण चॉकलेटचा प्रसादही चुकवू नका.

या ठिकाणी रेल्वे, विमान, रस्ते मार्गाने सहज जाता येते आणि निवासासाठी केरळ टूरिझमबरोबच अन्य रेस्ट हाऊसेस, स्टार हॉटेल्स, साधी र्हॉटेल यांची  चांगली सुविधा आहे. खास केरळी जेवणाचा आस्वाद येथे मनमुराद घेता येतो.

Leave a Comment