सूर्यापासून उर्जा ग्रहण करणारे सोलर सेल आता इतिहासजमा होण्याची शक्यता संशोधकांच्या नव्या शोधामुळे निर्माण झाली आहे. ओरेगन विद्यापीठातील केमिकल इंजिनिअर चिन हुंग चांग यांनी सूर्यापासूनच तयार होऊ शकणारे सोलर सेल विकसित केले आहेत. आज वापरात असलेल्या पारंपारिक सिलीकन सेलची जागा आता हे नवे सेल घेतील. त्यासाठी लागणारा वेळही कमी असेल आणि खर्चही कमी असेल असे चांग यांचे म्हणणे आहे.
पारंपारिक सेलपेक्षा वजनाने हलके असलेले हे सेल इमारतींच्या आतील कोटींगच्या रूपात सूर्यप्रकाशापासूनच तयार केले जातात. यामुळे सौर उर्जा निर्मितीसाठी येणारा खर्च कमी होतोच पण उत्पादनातही वाढ होऊ शकते असा चांग यांचा दावा आहे. हे सेल पर्यावरणपूरक आहेत शिवाय कांही मिनिटांच्या अवधीत सौर उर्जा सामग्री तयार करता येते. अन्य प्रक्रियेत अशी सामग्री तयार करण्यासाठी अर्धा तास ते दोन तासांचा कालावधी लागतो.
या सेलचे उत्पादन ज्या प्रमाणात वाढविले जाईल तितका त्यासाठी येणारा खर्च कमी असेल असेही चांग यांचे म्हणणे आहे. त्यासाठी कॉपर इंडियम डिसेलेनाइडचा वापर केला गेला असून तांबे, जस्त, टीन, सल्फाईडचा वापरही हे सेल तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो असे समजते.