विलास मुत्तेमवार यांच्या कार्यालयावर छापा

नागपूर: ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमधील काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या कार्यालयावर मध्यरात्री निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांनी छापा टाकला. मुत्तेमवार यांच्या कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर उभ्या असणा-या एका वाहनात मोठी रोकड असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली होती.
अधिका-यानी संबंधित खोली आणि वाहनाची तपासणी करण्याची मागणी केली असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी चाव्या उपलब्ध नसल्याचे सांगत तपासणीला विरोध केला.

यानंतर पर्यवेक्षक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बराच वाद झाला. त्यानंतर सकाळपर्यंत किल्ली न मिळाल्याने कुलूप तोडून खोलीत आणि गाडीत खरंच रोकड आहे का याची तपासणी करण्याचा निर्णय निवडणूक अधिका-यानी घेतला.

या प्रकरणानंतर मुत्तेमवार यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी रात्रीपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी या खोलीतून आणि गाडीतून नक्की काय मिळते हे तपासणीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.