रात्री खाणे लठ्ठपणास निमंत्रण

कोणाचीही जाडी वाढणे हे त्याच्या खाण्यावर अवलंबून असते, ही तर गोष्ट उघडच आहे. मात्र आपण किती खातो आणि काय खातो या बरोबरच आपण कधी खातो याला अधिक महत्व आहे असे आता आहार शास्त्रज्ञ सांगत आहेत. जास्त तळलेले, गोड पदार्थ खाल्ले की माणसाची जाडी वाढते हे तर उघडच आहे. त्याच बरोबर भरपूर खाल्ले आणि ते पचवण्यास आवश्यक तेवढा व्यायाम केलाच नाही तरीही माणसाची जाडी वाढते. मात्र आता काही प्रयोगांनी असे सिद्ध झाले आहे की, रात्री उशीरा खाण्याने जाडी वाढते. एकच माणूस दिवसभरात जेवढे काही खातो तेवढे त्याने संध्याकाळच्या नंतर खाल्ले तर त्याची जाडी वाढते. पण तेवढेच अन्न त्याने संध्याकाळ होण्याच्या आत खाल्ले तर त्याची जाडी तुलनेने कमी वाढते. हा प्रयोग अमेरिकेतल्या मूळ भारतीय असलेल्या शास्त्रज्ञाने केला आहे. 

साल्क इन्स्टिटूट ऑङ्ग बायॉलॉजीकल स्टडिज कॅलिङ्गोर्निया या संस्थेत काम करणार्‍या डॉ. सच्चिदानंद पांडा या शास्त्रज्ञाने उंदरावर केलेले प्रयोग यादृष्टीने उद्बोधक ठरलेले आहे. त्यांच्या प्रयोगातून त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, इंटरनेट ब्राऊझिंग करत करत आणि टी.व्ही. वरल्या सिरिअल बघत बघत खाल्ल्याने सुद्धा वजन वाढते. यावर प्रयोग करण्यासाठी उंदरांची निवड केली आणि बरेच उंदीर गोळा करून त्यांचे दोन गट केले. एका गटातल्या उंदरांना रात्रंदिवस खायला दिले आणि दुसर्‍या गटातल्या उंदरांना केवळ रात्रीच खायला दिले. त्यांच्या खाण्याच्या वेळा बदलल्या असल्या तरी त्यांना दिलेल्या अन्नाची मात्रा मात्र समान होती. मात्र त्यातल्या रात्री अन्न दिलेल्या उंदरांचे वजन दिवसरात्र खाणार्‍या उंदरांच्या मानाने जास्त वाढलेले आढळले. आपल्या शरीराचे एक जैविक घड्याळ असते असे म्हणतात. परंतु सच्चिदानंद पांडा यांच्या मते केवळ शरीराचेच घड्याळ असते असे नाही तर शरीरातल्या प्रत्येक अवयवाचे एक वेगळे घड्याळ असते. त्यांना पुरवले जाणारे पाणी, हवा आणि अन्न यांचे वेळापत्रक हे त्या त्या अवयवाच्या घड्याळाशी सुसंगत असल्यास त्या अवयवाचे काम चांगले चालते. 

तसा आपल्या पचन संस्थेतल्या सर्व अवयवांचा विचार केला असता अन्न पदार्थांचे सेवन संध्याकाळी करणे हे घातक ठरत असते. म्हणून जैन मुनी आपल्या अनुयायांना दिवे लागल्यानंतर जेवू नये असा उपदेश देत असतात. आयुर्वेदा मध्ये सुद्धा आपल्या शरीराची पचन शक्ती संध्याकाळी वरचेवर मंद होत जाते, असे सांगितलेले आहे. त्यामुळे दिवसा केलेले जेवण जसे पटकन् पचन होईल तसे संध्याकाळचे जेवण पचन होत नाही. मुळात माणसाला संध्याकाळ ही विश्रांती घेण्यासाठी निर्माण झालेली आहे. जे लोक दिवसा काम आणि संध्याकाळी विश्रांती घेतात त्यांची प्रकृती छान राहते. पक्षी आणि पशू सुद्धा हा नियम पाळतात. पण माणूस मात्र संध्याकाळी जास्त जेवतो, हे अनैसर्गिक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment